ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथा एकदिवसीय क्रिकेट सामना आज रंगणार

ऑस्ट्रेलियाने सहा वेळा हा विक्रम केला आहे.. दक्षिण आफ्रिकेने पाच वेळा. पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांनी दोनदा, न्यूझीलंडने एकदा, इंग्लंडनेही हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. पण बांगलादेश आणि झिम्बाब्वेला हे जमले नाही. आणि भारतीय क्रिकेट संघालाही. हा विक्रम नक्की कोणता? तर सलग दहा एकदिवसीय सामन्यांमध्ये विजय मिळवण्याचा. पण ही गोष्ट आता मांडायची गरज नेमकी काय? हा प्रश्नही क्रिकेट चाहत्यांना सतावत असेल. याचे कारण म्हणजे भारताने आतापर्यंत सलग नऊ एकदिवसीय सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील चौथा एकदिवसीय सामना जिंकून ‘विजयादशमी’साठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये विजय मिळवत पाच सामन्यांची मालिका खिशात टाकली आहे. आता भारत सलग दहावा सामना जिंकणार का आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियावर निर्भेळ यश मिळवणार का, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.

वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात अँटिग्वा येथील सामन्यानंतर भारताने एकही एकदिवसीय लढत गमावलेली नाही. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला २६ जानेवारीपासून एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा समजला जात आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ पराभवाचा दुष्काळ संपवणार की भारतीय संघ सलग दहावा विजय साजरा करणार, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.

भारतीय संघ सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्मात आहे. गोलंदाजीमध्ये भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल हे भेदक गोलंदाजी करीत आहेत. हार्दिक पंडय़ा हा अष्टपैलू खेळाडू या मालिकेत सर्वस्व पणाला लावून खेळताना दिसत आहे. आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यांमध्ये त्याच्याकडून नेत्रदीपक कामगिरी पाहायला मिळाली आहे. अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांनी गेल्या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती. या दोघांचे फॉर्मात येणे संघाचे मनोबल उंचावणारे असेल. कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्याकडून लौकिकाला साजेशी कामगिरी पाहायला मिळाली आहे. पण केदार जाधव आणि मनीष पांडे यांना अजूनही अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. या सामन्यात कदाचित पांडेच्या जागी लोकेश राहुलला संधी मिळण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात छाप पाडण्यात अपयशी ठरली आहे. धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा हा शंभरावा एकदिवसीय सामना आहे. त्यामुळे दमदार खेळी साकारून आपला ‘शतक महोत्सव’ साजरा करण्यासाठी वॉर्नर उत्सुक असेल. तिसऱ्या सामन्यात पहिल्यांदाच खेळणाऱ्या आरोन फिंचने शतकी खेळी साकारली होती, त्याच्याकडून कामगिरीत सातत्य ठेवण्याची अपेक्षा असेल. कर्णधार स्टीव्हन स्मिथने या मालिकेत अर्धशतकांची वेस ओलांडली असली तरी त्याला एकदाही शतक झळकावता आलेले नाही. त्यामुळे त्याच्यासाठीही हा सामना महत्त्वाचा असेल. गोलंदाजीमध्ये अ‍ॅश्टॉन अगर जायबंदी असल्याने अ‍ॅडम झाम्पाला या सामन्यात संधी मिळू शकते.

संभाव्य संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, कुलदीप यादव.

ऑस्ट्रेलिया : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, हिल्टन कार्टराईट, ट्रॅव्हीस हेड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनीस, मॅथ्यू वेड, जेम्स फॉल्कनर, नॅथन कोल्टर-नील, पॅट कमिन्स, केन रिचर्डसन, अ‍ॅश्टॉन अगर, अ‍ॅडम झम्पा, पीटर हॅण्डकोम्ब, अ‍ॅरोन फिंच.

सामन्याची वेळ : दुपारी १.३० वाजल्यापासून.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर.