इंग्लंडविरुद्धचा पहिला ट्वेन्टी-२० सामना आज कानपुरात

कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत इंग्लंडवर वर्चस्व गाजवल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ आता ट्वेन्टी-२० प्रकारात प्रभुत्व सिद्ध करण्यासाठी सज्ज झाला आहे. कानपूरच्या छोटेखानी मैदानावर पाहुण्या इंग्लंड संघाला चीतपट करण्यासाठी भारतीय संघ आतुर आहे. दुसरीकडे चार कसोटी आणि दोन एकदिवसीय सामन्यांनंतर इंग्लंडने विजय मिळवला. हा विजयी सूर कायम राखण्यासाठी इंग्लंडचा संघ प्रयत्नशील आहे.

भारताने एकदिवसीय संघात सहा बदल केले आहेत. नियमित फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती देण्यात आली आहे. यामुळे अमित मिश्राचे संघातील स्थान पक्के झाले आहे. दुसऱ्या फिरकीपटूच्या स्थानासाठी परवेझ रसूल आणि युझवेंद्र चहल यांच्यात चुरस आहे. इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादसाठी दिमाखदार प्रदर्शन करणारा ३७ वर्षीय आशीष नेहरा हुकमी एक्का ठरू शकतो. जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांच्यात एका जागेसाठी शर्यत आहे.

सलामीवीराच्या भूमिकेसाठी लोकेश राहुल, मनदीप सिंग आणि ऋषभ पंत यांची नावे चर्चेत आहेत. ऋषभ पंत भन्नाट फॉर्ममध्ये आहे. लोकेश राहुल एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी करू शकला नाही. मनदीप सिंगला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थिरावण्याची संधी मिळालेली नाही. यांच्यापैकी कोणाला संधी मिळते हे पाहणे उत्सुकतेचे आहे. ट्वेन्टी-२० विशेषज्ञ अनुभवी सुरेश रैना संघात परतला आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर रैना भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. कर्तृत्व सिद्ध करण्याची रैनाला उत्तम संधी आहे. रैनाला संघात समाविष्ट करण्यासाठी कर्णधार कोहली सलामीला येण्याची शक्यता आहे. युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंडय़ा ही रचना कायम राहण्याची शक्यता आहे. मनीष पांडेही संधीचे सोने करण्यासाठी उत्सुक आहे.

चतुर नेतृत्वशैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मॉर्गनकडून इंग्लंडला मोठय़ा अपेक्षा आहेत. जो रूट दुखापतीतून सावरला असून या सामन्यात खेळणार आहे. चांगल्या सुरुवातीनंतरही रूटला एकदिवसीय मालिकेत मोठी खेळी करता आलेली नाही. सॅम बिलिंग्स आणि जेसन रॉय या धडाकेबाज सलामीवीरांकडून तडाखेबंद खेळीची अपेक्षा आहे. जोस बटलरला भारतीय खेळपट्टय़ांवर ट्वेन्टी-२० सामने खेळण्याचा अनुभव आहे. तो उपयुक्त ठरू शकतो. मोईन अली आणि बेन स्टोक्स हे अष्टपैलू खेळाडू इंग्लंडसाठी जमेची बाजू आहे. वेगवान आणि भेदक माऱ्यासाठी प्रसिद्ध टायमल मिल्स इंग्लंडचे अस्त्र असणार आहे. त्याच्या जोडीला लियाम प्लंकेट, जेक बॉल आणि ख्रिस जॉर्डन हे त्रिकूट आहे. दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्याने डावखुरा वेगवान गोलंदाज डेव्हिड विली या लढतीत खेळू शकणार नाही.

खेळपट्टी

खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन ठरण्याची शक्यता आहे. पाटा स्वरूपाच्या खेळपट्टीवर धावांची टांकसाळ उघडण्याची सुवर्णसंधी दोन्ही संघांतील फलंदाजांना मिळणार आहे. मोठय़ा प्रमाणावर दव पडत असल्याने सामना लवकर खेळवण्यात येणार आहे. मैदानाचे आकारमानही छोटे असल्याने चाहत्यांसाठी चौकार व षटकारांची पर्वणी ठरू शकते.

संघ

  • भारत : विराट कोहली (कर्णधार), जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, महेंद्रसिंग धोनी, भुवनेश्वर कुमार, मनदीप सिंग, अमित मिश्रा, आशीष नेहरा, मनीष पांडे, हार्दिक पंडय़ा, ऋषभ पंत, परवेझ रसूल, लोकेश राहुल, युवराज सिंग, सुरेश रैना.
  • इंग्लंड : इऑन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जेक बॉल, सॅम बिलिंग्ज, जोस बटलर, लियाम डॉसन, जॉनी बेअरस्टो, ख्रिस जॉर्डन, टायमल मिल्स, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, डेव्हिड विली.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर

वेळ : संध्याकाळी ४.३० पासून