India vs England 3rd Test, Karun Nair Wicket: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडने भारतीय संघासमोर विजयासाठी १९३ धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतीय संघाची बॅटिंग लाईनअप पाहता, पाचव्या दिवशी भारतीय संघ लॉर्ड्सच्या मैदानावर ऐतिहासिक विजय मिळवण्याची संधी असणार आहे. मात्र भारताला सुरुवातीला दोन मोठे धक्के बसले आहेत.
भारताकडून डावाची सुरुवात करण्यासाठी यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुलची जोडी मैदानावर आली. या जोडीकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. मात्र यशस्वी जैस्वालने जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर नको तो फटका मारला आणि आपली विकेट फेकली. जैस्वाल ७ चेंडू खेळून शून्यावर माघारी परतला. जैस्वाल स्वस्तात माघारी परतल्यानंतर भारताला आणखी एक मोठा धक्का बसला.
करुण नायर स्वस्तात माघारी
यशस्वी जैस्वाल बाद झाल्यानंतर करुण नायर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. करुण नायरचा अनुभव पाहता त्याने मैदानावर टिकून राहणं खूप महत्वाचं होतं. पण कार्सच्या गोलंदाजीवर त्याला माघारी परतावं लागलं आहे. तर झाले असे की, इंग्लंडकडून १३ वे षटक टाकण्यासाठी ब्रायडन कार्स गोलंदाजीला आला. या षटकात कार्सचे चेंडू टप्पा पडून आत येत होते. षटकातील तिसरा चेंडू त्याने ऑफ स्टंपच्या खूप बाहेर टाकला. पण हा चेंडू टप्पा पडला आणि आत आला. जो करुण नायरच्या पॅडला लागला. करुणने हा चेंडू सोडला होता, पण स्विंग झाल्यामुळे चेंडू स्टंपच्या समोर राहिला. त्यामुळे पंचांनी त्याला बाद घोषित केलं.
अशी विकेट फेकल्यानंतर आता करुण नायरला प्लेइंग ११ मधून बाहेर करण्याची मागणी केली जात आहे. कारण या मालिकेतील तिन्ही सामन्यात त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाही. ३०० धावांची खेळी केल्यानंतर त्याला भारतीय संघातून बाहेर पडावं लागलं होतं. आता ८ वर्षानंतर त्याने भारतीय संघात पुनरागमन केलं. पण पुनरागमनात त्याला आपली छाप सोडता आलेली नाही.