India vs England Day 5, Weather Update: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. भारतीय संघाने विजयासाठी इंग्लंडसमोर ३७४ धावांचं आव्हान ठेवलं आहे. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला दमदार सुरुवात मिळाली आहे. चौथ्या दिवशी इंग्लंडचा संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता. विजयासाठी अवघ्या ३५ धावांची गरज असताना पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. दरम्यान पाचव्या दिवशी कसं असेल हवामान? जाणून घ्या.
पाचव्या दिवशी पाऊस पडणार का?
ॲक्यूवेदरने दिलेल्या वृत्तानुसार, ४ ऑगस्टला पाऊस पडण्याची शक्यता ही ६० टक्के इतकी असणार आहे. हा सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. त्यावेळी पाऊस पडण्याची शक्यता ही ५ टक्के इतकी असणार आहे. दुपारी २,३ आणि ४ वाजता पाऊस पडण्याची शक्यता ही ६० टक्के इतकी असणार आहे. पण सामना इतका वेळ सुरू राहण्याची शक्यता खूप कमी आहे. कारण इंग्लंडला विजयासाठी ३५ धावांची गरज आहे. तर भारतीय संघाला केवळ ४ गडी बाद करायचे आहेत.
भारतीय संघाने केल्या ३९६ धावा
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या २२४ धावांवर आटोपला होता. पहिल्या डावात कमी धावा केल्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. दुसऱ्या डावाच्या सुरूवातीला भारतीय संघाला मोठा धक्का बसला. केएल राहुल स्वस्तात माघारी परतला. त्याला अवघ्या ७ धावा करता आल्या. त्यानंतर फलंदाजीला आलेला साई सुदर्शन ११ धावांवर माघारी परतला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या आकाशदीपने ६६ धावांची दमदार खेळी. त्याने यशस्वी जैस्वालसोबत मिळून १०० धावांची भागीदारी केली.
सलामीला फलंदाजी करताना यशस्वी जैस्वालने ११८ धावांची खेळी केली. तर कर्णधार गिलने ११, करूण नायरने १७ धावांची खेळी केली. तर रवींद्र जडेजाने ५३, ध्रुव जुरेलने ३४, वॉशिंग्टन सुंदरने ५३ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने दुसऱ्या डावात ३९६ धावांचा डोंगर उभारला.
इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी ३७४ धावांची गरज होती. याआधी या मैदानावर इतक्या मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करता आला नव्हता. त्यामुळे सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला इतिहास घडवायचा होता. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडकडून बेन डकेट आणि जॅक क्रॉउले यांनी दमदार सुरूवात करून दिली. दोघांनी मिळून अर्धशतकी भागीदारी केली. क्रॉउलेने अवघ्या १४ धावा केल्या. तर बेन डकेटने ५४ धावांची खेळी केली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ओली पोपला २७ धावांची खेळी करता आली.
चौथ्या क्रमांकावर आलेला जो रूट इंग्लंडसाठी पुन्हा एकदा खंबीर उभा राहिला. त्याने १०५ धावांची खेळी केली. तर हॅरी ब्रुकने १११ धावांची खेळी केली. हॅरी ब्रुकला १९ धावांवर जीवदार मिळालं होतं. याचा फायदा घेत त्याने आपलं शतक पूर्ण केलं. त्याने १११ धावांची खेळी केली.