पीटीआय, हैदराबाद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकीकडे मायदेशात १२ वर्षांत एकही कसोटी मालिका न गमावलेला भारतीय संघ, तर दुसरीकडे ‘बॅझबॉल’ या अति-आक्रमणाच्या प्रवृत्तीसह खेळ करत प्रतिस्पध्र्यावर दडपण आणणारा इंग्लंड संघ. जागतिक क्रिकेटमधील हे दोन बलाढय़ संघ आज, गुरुवारपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत समोरासमोर येणार आहेत. अगदी पहिल्या चेंडूपासून आक्रमक शैलीत खेळणारे इंग्लंडचे फलंदाज विरुद्ध भारताचे रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे गुणवान फिरकी गोलंदाज यांच्यातील द्वंद्व ही क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे.

अ‍ॅलेस्टर कूकच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाने २०१२मध्ये भारतात कसोटी मालिका जिंकण्याची किमया साधली होती. त्यानंतर मात्र भारताला भारतात नमवणे कोणत्याही संघाला शक्य झालेले नाही. भारतीय संघाने मायदेशात सलग १६ कसोटी मालिका जिंकल्या असून यात सात वेळा त्यांनी निर्भेळ यश मिळवले आहे. गेल्या १२ वर्षांमध्ये मायदेशात झालेल्या ४४ पैकी केवळ तीन कसोटी सामन्यांत भारताला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे भारताच्या या वर्चस्वाला धक्का देणे हे प्रशिक्षक म्हणून ब्रेंडन मॅककलम आणि कर्णधार म्हणून बेन स्टोक्ससमोरील आतापर्यंतचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे.

हेही वाचा >>>पाकिस्तानी वंशाचा इंग्लंडचा फिरकीपटू शोएब बशीरला अखेर व्हिसा मंजूर

मायदेशातील भारताच्या यशामागील सर्वात मोठे कारण म्हणजे ऑफ-स्पिनर अश्विन आणि डावखुरा फिरकीपटू जडेजा यांची उत्कृष्ट कामगिरी. या दोघांनी एकत्रित खेळताना ५०० हून अधिक बळी मिळवले आहेत. त्यातही अश्विनची कामगिरी अधिक कौतुकास्पद ठरली आहे. त्याने २०१२ सालापासून ४६ कसोटी सामन्यांत २८३ गडी बाद केले आहेत. त्यामुळे या मालिकेतही अश्विन-जडेजा या फिरकीपटूंच्या जोडीने योगदान भारतासाठी निर्णायक ठरेल. हैदराबाद येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीची खेळपट्टी फिरकीला अनुकूल असण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय संघ या सामन्यात तीन फिरकीपटूंसह खेळणार हे जवळपास निश्चित असून तिसऱ्या फिरकीपटूच्या स्थानासाठी अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्यात स्पर्धा आहे. मात्र, अक्षरने यापूर्वी मायदेशात इंग्लंडविरुद्ध चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे सध्या तो या स्पर्धेत आघाडीवर आहे.

दुसरीकडे, इंग्लंडचा संघ आता भारताचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी नक्कीच उत्सुक असेल. इंग्लंडच्या संघाने स्टोक्सच्या नेतृत्वाखाली २०२२मध्ये पाकिस्तानात जाऊन ३-० अशा फरकाने कसोटी मालिका जिंकली होती. त्यामुळे आशियात यश मिळवण्यासाठी काय केले पाहिजे हे त्यांना ठाऊक आहे. त्यातच खेळपट्टी कशीही असली आणि भारताचे गोलंदाज कितीही प्रभावी ठरत असले, तरी आम्ही आक्रमकतेला आळा घालणार नसल्याचे मॅककलमने स्पष्ट केले आहे. मात्र, इंग्लंडचा संघ आक्रमक शैलीतच खेळत राहिला तर गोलंदाज म्हणून आम्हालाही बळी मिळवण्याची अधिक संधी असेल असे भारताचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद सिराज म्हणाले आहेत. दोन्ही संघ पूर्ण आत्मविश्वासानिशीच या मालिकेसाठी मैदानात उतरणार हे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा >>>ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा: झ्वेरेव्हचा अल्कराझला धक्का; पुरुष एकेरीत मेदवेदेवचीही उपांत्य फेरीत धडक

भारतीय फलंदाजीची रोहितवर भिस्त

विराट कोहली वैयक्तिक कारणास्तव पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकणार असल्याने भारताच्या फलंदाजीची पूर्ण भिस्त ही कर्णधार रोहित शर्मावर असणार आहे. रोहित आणि यशस्वी जैस्वाल हे मुंबईकर भारताच्या डावाची सुरुवात करतील. मधल्या फळीत शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल खेळणे अपेक्षित आहे. कोहलीच्या अनुपस्थितीत रजत पाटीदारचा भारतीय चमूत समावेश करण्यात आला आहे. इंग्लंडच्या संघात तीन फिरकीपटू

इंग्लंडने पहिल्या कसोटीच्या पूर्वसंध्येलाच आपल्या अंतिम ११ खेळाडूंचा संघ जाहीर केला. या संघात तीन फिरकीपटूंना स्थान मिळाले आहे. डावखुरा फिरकीपटू टॉम हार्टली याला पदार्पणाची संधी मिळणार आहे. त्याच्यासह अनुभवी डावखुरा फिरकीपटू जॅक लिच आणि युवा लेग-स्पिनर रेहान अहमद यांचा या संघात समावेश आहे.

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल, केएस भरत (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमरा (उपकर्णधार), मुकेश कुमार, आवेश खान, रजत पाटीदार.

इंग्लंड (अंतिम ११) : बेन स्टोक्स (कर्णधार), झॉक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (यष्टिरक्षक), रेहान अहमद, टॉम हार्टली, जॅक लिच, मार्क वूड.

वेळ : सकाळी ९.३० वा. थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८, जिओ सिनेमा

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs england first test match from today in hyderabad sport news amy