कॅनडावर दणदणीत विजय मिळवल्यानंतर भारताच्या युवा हॉकी संघाने इंग्लंड संघाच्या दिशेने आपला मोर्चा वळवला असून कनिष्ठ हॉकी विश्वचषक स्पध्रेत शनिवारी उभय संघांमध्ये लढत रंगणार आहे.

लखनौ येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या ‘ड’ गटातील लढतीत यजमान भारताने ४-० अशा फरकाने कॅनडावर, तर इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेवर ४-२ अशी  मात केली होती. त्यामुळे विजयपथावर कायम राहण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील असतील. गटात अपराजित राहून अव्वल स्थान पटकावण्याबरोबर पुढील फेरीत सहा वेळा जेतेपद पटकावणाऱ्या जर्मनीला टाळण्याचे आव्हानही या संघांसमोर आहे.

हरेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या भारतीय संघासाठी हे वर्ष स्वप्नवत आहे. आशियाई चषकापाठोपाठ भारताने व्हेलेंसिया येथे पार पडलेल्या चार देशांच्या स्पध्रेत जर्मनीला नमवून जेतेपदाला गवसणी घातली आहे. त्यामुळे या विश्वचषक स्पध्रेत भारत जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धचा विजय यजमानांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित करणार आहे. मात्र, पहिल्यावहिल्या विश्वविजेतेपदासाठी इंग्लंडचे खेळाडूही आतुर आहेत. त्यांना १९९७ आणि २००१मध्ये चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

गतविजेत्यांचा विजय

शुक्रवारी झालेल्या लढतीत गतविजेत्या जर्मनीने २-१ अशा फरकाने न्यूझीलंडवर सहज विजय मिळवून ‘क’ गटात अव्वल स्थान निश्चित केले. हेर्झब्रूच टिम (२४ मि.) व बोइकेल अँटोन (५१ मि.) यांनी जर्मनीसाठी, तर लेन सॅम (४ मि.) याने न्यूझीलंडसाठी गोल केला. याच गटात स्पेनने ४-१ अशा फरकाने जपानचा धुव्वा उडविला. मार्स सेराहिमा (८ मि.), लुकास गार्सिया (२४ मि. व ३७ मि.) आणि पॅब्लो डी अ‍ॅबाडाल (२५ मि.) यांनी स्पेनच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. जपानसाठी एकमेव गोल अत्सुशी सुजीयामाने केला.  ‘ब’ गटात बेल्जियमने इजिप्तवर ४-० असा विजय मिळवला, तर ‘अ’ गटातील लढतीत ऑस्ट्रियाने बलाढय़  अर्जेटिनाला १-१ असे बरोबरीत रोखले.

  • सामन्याची वेळ : सायंकाळी ६ वाजल्यापासून
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स २ एचडी

कोलकाता-मुंबई यांच्यात आघाडीसाठी चुरस

कोलकाता : अ‍ॅटलेटिको डी कोलकाता आणि मुंबई सिटी एफसी यांच्यात येथील रबींद्र सरोवर स्टेडियमवर शनिवारी इंडियन सुपर लीगच्या उपांत्य फेरीतील पहिल्या टप्प्याचा सामना होणार आहे. अंतिम फेरी गाठण्याच्या दृष्टीने या लढतीत विजय मिळवून आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ आतुर आहेत.

कोलकाताचे प्रशिक्षक होजे मॉलिना म्हणाले की, ‘मुंबईविरुद्ध आणखी एक लढत होत आहे. साखळीत आम्ही त्यांच्याविरुद्ध चांगला खेळ केला. आमचा संघ जिंकू शकेल असा विश्वास वाटतो. मुंबईच्या आक्रमणपटूंना रोखण्यासाठी बचावात्मत खेळाबरोबर आक्रमक खेळही करावा लागेल. ’

घरच्या मदानावरील कोलकाताची कामगिरी निराशाजनक ठरली आहे. त्यांना सात पकी एकच सामना जिंकता आला आहे. साखळीतील आठ सामने बरोबरीत सुटले आहेत. मॉलिना म्हणाले की, ‘आम्ही बरोबरीसाठी कधीच खेळलो नाही.  नेहमीच प्रत्येक सामना जिंकण्यासाठी खेळतो. जिंकू शकलो नाही तर किमान बरोबरीसाठी प्रयत्न करू. पराभूत होणे परवडणारे नाही.’

मुंबईने साखळीत सर्वोत्तम फॉर्म राखत अव्वल स्थान मिळविले. या लढतीत त्यांचे पारडे जड असल्याचे वाटत आहे. मुंबईचे प्रशिक्षक अलेक्झांड्रे गुईमाराएस म्हणाले की, ‘आम्ही उपांत्य फेरीत प्रथमच खेळत आहोत, तर कोलकाताने यापूर्वीच दोन वेळा उपांत्य फेरीचा अनुभव घेतला आहे. पहिला उपांत्य सामना खेळण्यासाठी आतूर आहोत. संपूर्ण स्पध्रेत केला तसा चांगला खेळ करण्याची आमची इच्छा आहे.’

मुंबईने स्पध्रेतील सर्वोत्तम बचाव प्रदíशत केला आहे. त्यांच्याविरुद्ध केवळ आठ गोल झाले आहेत. याबाबत गुईमाराएस म्हणाले की, ‘संपूर्ण स्पध्रेत आम्ही फार चांगले स्थर्य राखू शकलो. संघाची एक वेगळी ओळख आहे आणि ती कायम राखण्यासाठी आम्हाला खेळावे लागेल.’

  • सामन्याची वेळ : सायंकाळी ७ वाजल्यापासून
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स ३, स्टार स्पोर्ट्स ३ एचडी

 

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पध्रेची उत्सुकता शिगेला

सागर, अभिजित, विजय, विलास अंतिम फेरीत

पुणे  : वरिष्ठ गट अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे. गादी विभागात सागर बिराजदार (लातूर) आणि अभिजित कटके (पुणे) यांच्यात अंतिम लढत होईल, तर माती विभागात विजय चौधरी (जळगाव) आणि विलास डोईफोडे (जालना) अंतिम लढत होईल. महाराष्ट्र केसरीची किताबी लढत शनिवारी होईल.

सागर आणि मुंबईचा गणेश जगताप ही गादीवरील पहिली उपांत्य लढत लक्षवेधी ठरली. सागर लातूरचा असला, तरी त्याची जडणघडण पुण्याची. त्यामुळे सागरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. पण प्रत्यक्षात मॅटवरती बचावात्मक खेळण्याच्या नादात सागर काहीसा मागे राहिला होता. गणेशने पहिल्या फेरीत त्याच्यावर ६-३ अशी आघाडी घेतली. मात्र, दुसऱ्या फेरीत सागरने आपल्या संयमाला आक्रमकेती जोड दिली आणि गणेशवर ताबा मिळवत तीन गुण वसूल केले. त्यामुळे निर्णायक फेरीच्या अखेरच्या टप्प्यात लढत ६-६ अशी बरोबरीत आली होती. त्याच वेळी सागरने आपला भारंदाज डाव टाकून झटपट ६ गुणांची कमाई करून लढतीचा निकाल स्पष्ट केला. दुसऱ्या उपांत्य लढतीत अभिजित आणि मुंबईचा समाधान पाटील यांच्यात झाली. ही लढतही सुरुवातीला बचावात्मक झाली. त्या प्रयत्नात कुस्ती न करण्याच्या पद्धतीमुळे दोन्ही मल्लांना पंचांकडून वारंवार ताकीद मिळाली. पहिल्या फेरीत समाधान १-० असा आघाडीवर होता. दुसऱ्या फेरीला समाधानचा पकड मिळवण्याचा प्रयत्न फसला आणि ती संधी साधत अभिजितने पट काढून झटपट ३ गुणांची कमाई केली. नियोजित लढत ३-२ अशी बरोबरीत सुटली होती. मात्र, पिछाडी भरून काढल्यामुळे नियमानुसार अभिजितला विजयी घोषित करण्यात आले.

माती विभागातील उपांत्य फेरीत विलासने लातूरच्या ज्ञानेश्वर गोचडेचे आव्हान अगदी अखेरच्या क्षणी कुस्ती चीतपट करत परतवून लावले. आघाडी असताना निष्कारण घाई करण्याचा फटका ज्ञानेश्वरला बसला आणि  विलासने संधी साधत त्याला चितपट केले. मातीवरील दुसऱ्या उपांत्य लढतीत डबल महाराष्ट्र केसरी विजय जाधव सहज विजयी झाला.