भारताच्या इंग्लंड दौऱ्याबद्दल एक मोठे अपडेट समोर आले आहे. एका वृत्तानुसार, निवड समितीने पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडिक्कल यांना इंग्लंडला पाठवण्यास नकार दिला आहे. सलामीवीर फलंदाज शुबमन गिलचे बदली खेळाडू म्हणून पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडिक्कल यांचा विचार केला जात होता. पण आता हे शक्य होणार नसल्याचे समोर आले आहे. यावरून हे स्पष्ट झाले आहे, की भारतीय संघाला मयांक अगरवाल किंवा अभिमन्यू ईश्वरन यांनाच संधी द्यावी लागेल.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार अभिमन्यू ईश्वरनला संघात समाविष्ट करण्याचा सल्ला निवड समितीने दिला आहे. शुबमन गिलच्या दुखापतीनंतर भारतीय संघ व्यवस्थापनाने त्याच्या बदलीची मागणी केली होती. पृथ्वी शॉ आणि देवदत्त यांना इंग्लंडला पाठविण्यास सांगितले होते. भारतीय संघाचे व्यवस्थापक गिरीश डोंगरे यांनी २८ जून रोजी बीसीसीआयला बदलीसाठी पत्र लिहिले होते.
हेही वाचा – दुर्दैवच..! गांगुलीसोबत खेळलेला क्रिकेटपटू पोटापाण्यासाठी विकतोय चहा
मात्र, निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयाशी सहमत असल्याचे दिसत नाही. अभिमन्यू ईश्वरनला अद्याप उच्च श्रेणीच्या कसोटी क्रिकेटसाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम नाही, असे संघ व्यवस्थापनाचे मत आहे. अशा परिस्थितीत त्याच्या निवडीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
भारताचा इंग्लंड दौरा
कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. या दौऱ्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. ४ ऑगस्टपासून सुरू होणारी ही मालिका १४ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. भारतीय संघात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, केएल विहारी, मयंक अग्रवाल, रोहित शर्मा, शुबमन गिल, अक्षर पटेल, आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, ऋषभ पंत, श्रीकर भरत, वृद्धीमान साहा, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर आणि उमेश यादव यांचा समावेश आहे.