वृत्तसंस्था, हिसोर (ताजिकिस्तान)
नवे प्रशिक्षक खालिद जमील यांच्या मार्गदर्शनाखाली दुसरा सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने ‘सीएएफए’ नेशन्स चषक फुटबॉल स्पर्धेत सोमवारी जागतिक क्रमवारीत २०व्या स्थानी असणाऱ्या इराणला कडवी झुंज दिली. मात्र, पूर्वार्धातील गोलशून्य बरोबरीनंतर उत्तरार्धात इराणने खेळ उंचावला आणि भारताला अखेरीस ०-३ असा पराभव पत्करावा लागला.

भारताच्या बचाव फळीने, तसेच गोलरक्षक गुरप्रीत संधू यांनी या सामन्यात सर्वोतोपरी प्रयत्न केले. उत्तरार्धाच्या मधल्या टप्प्यापर्यंत त्यांनी इराणची आक्रमणे रोखून धरली होती. मात्र, त्यानंतर अमीरहोसेन हुसेनजादेह (६०व्या मिनिट), अली अलीपूरघारा (८९व्या मि.) आणि तारांकित आघाडीपटू मेहदी तारेमी (९० मिनिटांनंतरच्या भरपाई वेळेत) यांनी ठरावीक अंतराने गोल करत गतविजेत्या इराणला विजय मिळवून दिला.

अनुभवी आणि इराणी प्रीमियर लीगमधील काही उदयोन्मुख खेळाडूंसह खेळणाऱ्या इराण संघाने भारतीय खेळाडूंना मोक्याच्या क्षणी निष्प्रभ केले. सामन्यात चांगला खेळ करुनही अखेरच्या क्षणात दमछाक झाल्यामुळे भारताला आपल्या खेळात सातत्य राखण्यात अपयश आले.

भारताने स्पर्धेत तुल्यबळ ताजिकिस्तानला २-१ असे हरवून चमकदार सुरुवात केली होती. भारताचा ‘ब’ गटातील अखेरचा सामना ४ सप्टेंबरला अफगाणिस्तानशी होणार आहे. प्रत्येक गटातील अव्वल संघ अंतिम फेरीत खेळतील, तर गटातील दुसऱ्या स्थानावरील संघांत तिसऱ्या क्रमांकासाठीची लढत होईल.