India vs Pakistan Head To Head Record In Asia Cup 2025: आशिया चषक २०२५ स्पर्धेला येत्या ९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. तर ज्या सामन्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे, असा भारत – पाकिस्तान सामन्याचा थरार १४ सप्टेंबरला रंगणार आहे. हा सामना होणार की नाही, अशी चर्चा सुरू होती. पण अखेर भारत सरकारने हिरवं कंदील दिल्याने हा सामना होणार, हे जवळजवळ निश्चित झालं आहे. यावेळी ही स्पर्धा टी -२० फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार आहे. दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांचा रेकॉर्ड कसा राहिला आहे? जाणून घ्या.
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा आमनेसामने येतात तेव्हा क्रिकेट चाहत्यांना हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळत असतो. दोन्ही संघांना पराभव मुळीच मान्य नसतो. त्यामुळे दोन्ही संघ पूर्ण जोर लावताना दिसून येत असतात.
टी -२० क्रिकेटमध्ये कोण कोणावर भारी?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रेकॉर्ड पाहिला तर भारताचा संघ नेहमीच आघाडीवर राहिला आहे. दोन्ही संघ टी- २० क्रिकेटमध्ये आतापर्यंत १३ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान १० सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. तर पाकिस्तानला अवघे ३ सामने जिंकता आले आहेत. या आकडेवारीवरून तुम्हाला अंदाज येईल की भारतीय संघ पाकिस्तानपेक्षा खूप पुढे आहे.
भारतीय संघाने २००७ मध्ये झालेल्या पहिल्या टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत करत जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. दरम्यान आशिया या दोन्ही संघांचा आशिया चषकातील रेकॉर्ड पाहिला, तर टी-२० फॉरमॅटमध्ये दोन्ही संघ ३ वेळा आमनेसामने आले आहेत. यादरम्यान २ सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजयाची नोंद केली आहे. तर एका सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता दोन्ही संघ चौथ्यांदा भिडणार आहेत. दरम्यान यावेळीही भारतीय संघ पाकिस्तानला पराभूत करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.