India vs Pakistan Match Cancelled: इंग्लंडमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजंड्स २०२५ स्पर्धेला जोरदार सुरूवात झाली आहे. या स्पर्धेत जगभरातील ६ संघ जेतेपदासाठी मैदानात उतरले आहेत. ज्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ते सर्व दिग्गज खेळाडू वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजंड्स या स्पर्धेत खेळताना दिसून येणार आहेत. दरम्यान आज या स्पर्धेत इंडिया चॅम्पियन्स विरूद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स असा सामना होणार होता. मात्र आयोजकांनी हा सामना रद्द करत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना हा आज खेळवला जाणार होता. मात्र, भारतीय खेळाडूंनी हा सामना खेळण्यास नकार दिला. शिखर धवनने एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत सांगितलं की, देश आधी, मग सर्व. त्यामुळे तो हा सामना खेळणार नाही. यासह हरभजन सिंग, युवराज सिंग आणि सुरेश रैना यांनी देखील हा सामना खेळणार नसल्याची भूमिका घेतली. त्यामुळे खेळाडू आणि भारतीयांच्या भावना लक्षात घेता, आयोजकांनी पोस्ट शेअर करून हा सामना अधिकृतरित्या रद्द करत असल्याची घोषणा केली आहे.
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स संघाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून निवेदन जारी करण्यात आले आहे. या निवेदनातून त्यांनी सामना अधिकृतरित्या रद्द करण्याची माहिती दिली आहे. यासह भारतीय खेळाडू आणि क्रिकेट चाहत्यांच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे माफी देखील मागितली आहे.
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्सच्या निवेदनात काय म्हटलं आहे?
आमचा उद्देश केवळ क्रिकेट चाहत्यांना आनंददायी क्षण देण्याचा होता. यावर्षी पाकिस्तानचा हॉकी संघ भारतात येणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील व्हॉलीबॉल सामन्यासह काही इतर क्रीडा सामन्यांवर नजर टाकल्यानंतर, आम्ही वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स स्पर्धेत भारत- पाकिस्तान सामन्याचे आयोजन सुरू ठेवण्याचा विचार केला. परंतु त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. म्हणून आम्ही भारत विरूद्ध पाकिस्तान सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही पुन्हा एकदा माफी मागतो आणि आशा करतो की, लोक आम्हाला समजून घेतील.
शिखर धवननेही या सामन्याआधी पोस्ट शेअर केली होती. त्याने आपल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे लिहिलं होतं की, देश आधी. त्यामुळे त्याने हा सामना खेळण्यास नकार दिला होता. पाकिस्तानकडून पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात निष्पाप भारतीयांना आपला जीव गमवावा लागला होता. या हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं होतं. त्यावेळी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी पाकिस्तानी सैन्याला समर्थन करताना दिसून आला होता.