India vs Pakistan ODI World Cup 2023 Match : आयसीसी वनडे क्रिकेट वर्ल्डकप २०२३ चं यजमानपद भारत भूषवणार असून या मोठ्या टूर्नामेंटमध्ये जबरदस्त संघांचा समावेश असणार आहे. आक्टोबर-नोव्हेंबरमध्ये या वर्ल्डकपचं आयोजन करण्यात येणार असून भारतीय चाहत्यांसाठी आता एक खूशखबर आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा महामुकाबला जगातील सर्वात मोठ्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होण्याची शक्यता आहे. २०१६ नंतर पहिल्यांदाच भारताच्या घरेलू मैदानावर दोन्ही संघं आमने-सामने येणार आहेत.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ने भारत विरुद्ध पाकिस्तान हायवोल्टेज सामन्याची मेजवानी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार असल्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये १ लाख प्रेक्षक बसण्याची आसनव्यवस्था आहे. आयपीएलच्या १६ व्या हंगामानंतर बीसीसीआय लवकरच वर्ल्डकपचं शेड्यूल जाहीर करेल.

नक्की वाचा – आंद्रे रसेलचा धमाका! टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास, ‘हा’ विक्रम करून विश्वक्रिकेटचा बनला बादशाह

वर्ल्डकपचं आयोजन ५ ऑक्टोबरपासून होण्याची शक्यता

सर्व गोष्टी अनुकूल असल्यास वनडे वर्ल्डकपचं आयोजन ५ ऑक्टोबरपासून होईल. या प्रतिष्ठित टूर्नामेंटसाठी १२ वेन्यू शॉर्ट लिस्ट केले आहेत. यामध्ये नागपूर, बंगळुरु, त्रिवेंद्रम, मुंबई, दिल्ली, लखनऊ, गुवाहाटी, हैद्राबाद, कोलकाता, राजकोट, इंदौर आणि धरमशाला यांचा समावेश आहे.

चेन्नई आणि बंगळुरुत पाकिस्तानचे जास्तीत जास्त सामने होणार?

रिपोर्टनुसार, सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान त्यांचे जास्तीत जास्त सामने चेन्नई आणि बंगळुरुत खेळू शकतात. तसंच तिसरा वेन्यू कोलकाता येथील ईडन गार्डन स्टेडियम असू शकतं. याबाबत चर्चासत्र सुरु आहे. याप्रमाणेच बांगलादेशचा संघही कोलकाता आणि गुवाहाटीत जास्तीत जास्त सामने खेळण्याची शक्यता आहे. बांगलादेशचा प्रवासातील अंतर पाहता या ठिकाणी सामने होण्याची शक्यता आहे.