India vs Pakistan, Asia Cup 2025 Final: आशिया चषक २०२५ स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश करणारे २ संघ ठरले आहेत. बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवत आशिया चषक २०२५ स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. याआधी बुधवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशवर एकतर्फी विजयाची नोंद करत अंतिम स्थान मिळवलं होतं. दरम्यान ४१ वर्षांनंतर भारत- पाकिस्तान दोन्ही संघ पहिल्यांदाच आशिया चषकातील अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. दरम्यान केव्हा, कधी आणि कुठे होणार हा सामना? जाणून घ्या.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत हाय व्हॉल्टेज सामने पाहायला मिळाले आहेत. पण हे दोन्ही संघ आतापर्यंत आशिया चषकातील अंतिम फेरीत आमनेसामने आले नव्हते. आता १७ हंगाम आणि ४१ वर्षांनंतर पहिल्यांदाच दोन्ही संघ अंतिम फेरीत भिडणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळू शकते. आशिया चषक २०२५ स्पर्धेत दोन्ही संघ २ वेळेस आमनेसामने आले होते. या दोन्ही सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानचा एकतर्फी धुव्वा उडवला होता.

भारत- पाकिस्तान सामन्याबाबत संपूर्ण माहिती

भारत- पाकिस्तान अंतिम सामना केव्हा होणार?

भारत- पाकिस्तान यांच्यात होणारा अंतिम सामना येत्या रविवारी २८ सप्टेंबरला होणार आहे.

भारत- पाकिस्तान यांच्यात होणारा अंतिम सामना किती वाजता सुरू होईल?
भारत- पाकिस्तान यांच्यात होणारा अंतिम सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल. तर नाणेफेक ७:३० वाजता होईल.

भारत- पाकिस्तान यांच्यात होणारा अंतिम सामना कुठे होणार आहे?
भारत- पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या अंतिम सामन्याचा थरार दुबईतील दुबई क्रिकेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये रंगणार आहे.

भारत- पाकिस्तान सामना लाईव्ह कुठे पाहता येणार?
भारत- पाकिस्तान यांच्यात होणारा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहता येणार आहे. यासह तुम्ही या सामना सोनी लिव्ह अॅपवर देखील लाईव्ह पाहू शकता.

बांगलादेशवर विजय मिळवून पाकिस्तानची अंतिम फेरीत धडक

बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात झालेला सामना हा सेमीफायनलपेक्षा कमी नव्हता. कारण विजय मिळवणाऱ्या संघाला थेट अंतिम फेरी गाठण्यची संधी होती. या सामन्यातील पहिल्या डावात बांगलादेशच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करून पाकिस्तानला १३५ धावांवर रोखलं. बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी १३६ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला २० षटकांअखेर ९ गडी बाद १२४ धावा करता आल्या. यासह पाकिस्तानने हा सामना ११ धावांनी आपल्या नावावर केला.