भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणीच असतो. कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या दोन्ही संघांना एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहण्यासाठी दोन्ही देशांचे क्रिकेटप्रेमी आतुरतेनं वाट पाहत असतात. दोन्ही संघांसाठी हा सामना प्रतिष्ठेचा असतो. यावर्षी एकदिवसीय विश्वचषकाचे सामने भारतात भरवले जाणार आहेत. विश्वचषक २०२३ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे.

या सामन्याची तारीख १५ ऑक्टोबर निश्चित करण्यात आली होती. मात्र या तारखेत बदल करण्यात आला असून १४ ऑक्टोबर रोजी हा सामना खेळवला जाणार आहे. भारत-पाकिस्तान सामन्याव्यतिरिक्त इतर ८ सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यात कुणाचं पारडं जड राहणार? याबाबत क्रिकेटतज्ज्ञांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतच आहेत. पण धार्मिक गुरू बागेश्वर बाबा यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे.

हेही वाचा- IND vs PAK: मोठी बातमी! वर्ल्ड कपसाठी नवे वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तानसह नऊ सामन्यांची तारीख बदलली

एका हिंदी वृत्तवाहिनीने अलीकडेच बागेश्वर बाबांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांना क्रिकेट पाहता का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बागेश्वर बाबांनी होकारार्थी उत्तर दिलं. त्यानंतर हा सामना कोण जिंकणार? असं विचारल्यानंतर बागेश्वर बाबा म्हणाले, “बाप… बाप होता है”. १४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्यात भारतीय संघच जिंकेल, असे संकेत बागेश्वर बाबांनी दिले आहेत. याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आयसीसीने ‘या’ नऊ सामन्यांची तारीख बदलली

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना १२ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजल्यापासून खेळवला जाईल. तर न्यूझीलंड आणि बांगलादेशचे संघ १३ ऑक्टोबरला आमनेसामने असतील. उभय संघांमधील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजता सुरू होईल.अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर १४ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान सामना रंगणार आहे. हा सामना दुपारी २ वाजल्यापासून होणार आहे. तर इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात १५ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजल्यापासून सामना होईल.

भारत-नेदरलँड सामन्याच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला

ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यात ११ नोव्हेंबरला सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी १०.३० वाजल्यापासून हा सामना रंगणार आहे. या दिवशी म्हणजेच ११ नोव्हेंबरला इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातही सामना होणार आहे. हा सामना दुपारी २ वाजल्यापासून सुरू होईल. त्याचबरोबर १२ नोव्हेंबरला भारतीय संघासमोर नेदरलँड्सशी भिडणार आहे. भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजल्यापासून खेळवला जाईल.