Team India’s Mental Preparation for the Final मुंबई : महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलियाचा १५ सामन्यांचा विजयरथ भारताने ३० ऑक्टोबर रोजी रोखला. एक अविस्मरणीय विक्रमी विजय नोंदवताना ऑस्ट्रेलियाला त्यांच्या विक्रमापासून वंचित ठेवले. ३३९ धावांचे लक्ष्य गाठताना भारताच्या महिला क्रिकेटपटूंनी केवळ गुणवत्ता आणि चिकाटीचे नव्हे, तर मानसिक भक्कमपणाचे दर्शन घडवले, तिथे ऑस्ट्रेलियाचा संघ मात्र गळपटला.

विश्वचषक स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियाला नॉक-आऊट फेऱ्यांमध्ये सातत्याने हरवणारा संघ भारतच. आता नवी मुंबईतच २ नोव्हेंबर रोजी होत असलेल्या अंतिम सामन्यासाठी भारताला तस्साच मानसिक कणखरपणा दाखवावा लागेल. कारण या सामन्यात भारतीय संघ ‘फेवरिट’ म्हणून उतरेल. दोन्ही संघांना यापूर्वी एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामन्यांमध्ये खेळण्याचा अनुभव नाही. त्यात या स्पर्धेत साखळी टप्प्यात दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या क्षणी खेळ उंचावून भारतीय संघाला हरवून दाखवले. परंतु नवी मुंबईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध अत्यंत महत्त्वाचा सामना खेळण्याचा, जिंकण्याचा अनुभव भारतासाठी निर्णायक ठरू शकतो.

India vs SA Women’s Final: लढाई दडपणाची

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने लक्ष्याचा पाठलाग करताना ३४१ धावा केल्या. या कामगिरीची शिल्पकार मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्ज असणे हा काव्यात्मक न्याय. पण हे करताना पॉवर-प्लेमध्ये स्मृती मनधानाचे बाद होणे नि अंतिम चढाईची वेळ आलेली असताना स्थिरावलेली कर्णधार हरमनप्रीत कौर बाद होणे या दोन्ही धक्क्यांवर भारताने मात केली. मनधानाची विकेट अनपेक्षित होती. हरमनप्रीतची विकेट भारताची लय पूर्णपणे बिघडवणारी ठरू शकली असती. या स्पर्धेत अखेरच्या टप्प्यातील चारपैकी तीन सामने भारताने सुरुवातीस सुस्थितीत असून गमावले होते. उपान्त्य सामन्यातही तसेच घडले असते, तर ‘चोकर्स’ हे क्रिकेटमधील सर्वांत अप्रिय लेबल भारतीय महिला संघावर चिकटले असते. हे घडले नाही. प्रत्येक वेळी सामना भारताच्या हातातून निसटतो असे दिसून येत असताना, या संघाने सणसणीत पुनरागमन करून दाखवले.पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅलिसा हिलीचा झेल हरमनप्रीतने सोडला, तो क्षण तत्क्षणी निर्णायक ठरू शकला असता. हिलीचा अनुभव पाहता तिला मिळालेले जीवदान महागात पडू शकेल, ही जाणीव खच्चीकरण करणारी ठरते. पण भारताने हे होऊ दिले नाही नि लगेचच हिलीची विकेट गेली.

India vs Aus Women’s Semi Final: ऑस्ट्रेलिया गळपटली

पावसाच्या व्यत्ययाने भारताची लय काहीशी बिघडली. फीबे लिचफील्ड आणि एलिस पेरी यांनी जोरदार प्रतिहल्ला चढवत सामना भारतापासून दूर नेला. ३४ षटकांत २ बाद २२० धावा असा स्थितीत, ऑस्ट्रेलियन फलंदाजीची खोली विचारात घेता ३५० पेक्षा अधिक धावांचा डोंगर अजिबात अनपेक्षित नव्हता. पण त्या टप्प्यावर बेथ मूनी बाद झाली आणि ऑस्ट्रेलियाच्या ८ विकेट्स ११८ धावांमध्येच गारद झाल्या. त्या ऑस्ट्रेलियाने गमावल्या असे म्हणण्यापेक्षा भारताने धीर आणि चिकाटी सोडली नाही असेच म्हणावे लागेल. फीबे लिचफिल्ड, एलिस पेरी आणि अॅश्ली गार्डनर वगळता एकही ऑस्ट्रेलियन फलंदाज पन्नाशी गाठू शकला नाही, याचे श्रेय भारतीय गोलंदाजांबरोबरच कर्णधार हरमनप्रीतला द्यावे लागेल.

साडेतीनशे धावांचे लक्ष्य उभे करण्यात आलेले अपयश ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या देहबोलीतून दिसत होते. फलंदाजीपाठोपाठ क्षेत्ररक्षण करतानाही, भारतापेक्षा ऑस्ट्रेलियन संघच अधिक दडपणाखाली आला. ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षकांनी तीन झेल सोडले, त्यांतील दोन सामनावीर जेमिमा रॉड्रिग्जचे होते. त्यांतीलही एक कर्णधार हिलीने सोडला. त्यावेळी जेमिमा ८२ धावांवर खेळत होती. भारताला विजयासाठी १०२ चेंडूंमध्ये १३१ धावांची गरज होती. पुढे जेमिमाला १०६ धावांवरही जीवदान मिळाले. जे सहसा ऑस्ट्रेलियासमोर भारतीय संगाबाबत घडते, तेच घडत होते. पण भूमिका बदलल्या होत्या! ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी १५ वाईडसह २६ अतिरिक्त धावांची खिरापत वाटली. इतक्या महत्त्वाच्या सामन्यात तीदेखील निर्णायक ठरते. दडपण दोन्ही संघांवर होते, पण गळपटली ऑस्ट्रेलिया.

India vs SA Women’s Final: मानसिक भक्कम भारत

कर्णधार हरमनप्रीत कौर आणि प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांच्यासमोर उपान्त्य सामन्यात दुहेरी आव्हान होते. समोर दिग्विजयी ऑस्ट्रेलियन संघ होता, हे पहिले आव्हान. पण या स्पर्धेत मोक्याच्या क्षणी भारतीय संघ गळपटला होता, त्यातून मानसिक दृष्ट्या भारताला लढण्यासाठी सिद्ध करणे हे दुसरे तितकेच मोठे आव्हान. साखळी टप्प्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच तीनशेहून अधिक धावांच्या लक्ष्याचा बचाव भारताला करता आला नव्हता. दक्षिण आप्रिकेविरुद्ध अडीचशे धावांचे लक्ष्य उभे केल्यानंतर, ५ बाद ८१ अशी दक्षिण आफ्रिकेची अवस्था होऊनही भारताला जिंकता आले नव्हते. सर्वाधिक बोचणारा पराभव इंग्लंडविरुद्ध ठरला. इंदूरमध्ये झालेल्या त्या सामन्यात अंतिम टप्प्यात ३० चेंडूंत ३६ धावांचे माफक लक्ष्य भारताला गाठता आले नाही.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना या दुःखद आठवणींचा परिणाम हरमनप्रीतच्या जिगरबाज संघाने कामगिरी होऊ दिला नाही. पॉवर-प्लेमध्ये मनधानासह दोन्ही सलामीवीर गमावल्यानंतर हरमनप्रीत आणि जेमिमा यांनी शांतपणे, पण धावगती सरस ठेवून वाटचाल सुरू ठेवली. शतकी भागीदारी रचली. १२० चेंडूंमध्ये १५० धावा अशी स्थिती आल्यानंतर ‘गियर’ बदलला. हे करत असताना मोक्याच्या क्षणी हरमनप्रीत बाद झाली, त्यावेळी ११३ धावा विजयासाठी हव्या होत्या. पण जेमिमा टिकून राहिलीच. पण नंतर आलेल्या प्रत्येक फलंदाजाने आपापली भूमिका व्यवस्थित निभावली. त्यामुळे नित्याने विकेट पडत गेल्या, तरी लक्ष्यदेखील जवळ येत गेले.

India vs SA Women’s Final:अंतिम सामन्यात…

जेमिमा-हरमनप्रीत यांची भागीदारी १६७ धावांची होती, जी महत्त्वाची होतीच. पण हरमनप्रीत बाद झाल्यानंतर दीप्ती शर्मा (२४), रिचा घोष (२६) आणि अमनज्योत कौर (नाबाद १५) यांनी मिळून ४१ चेंडूंमध्ये ६५ धावा चोपल्या. फलंदाजी ही भारताची ताकद आहे. मनधाना बाद झाली तरी हरमनप्रीत खेळते. या दोघी बाद झाल्या, तरी जेमिमा खेळते. आणि यांच्या बरोबरीने दीप्ती, रिचा, अमनज्योत अशा कितीतरी आपापले योगदान देत आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हे योगदान आणि हा भक्कमपणा पुरेपूर लागेल. कौशल्यात हा संघ भारताच्या थोडा कमी असेल, तर त्याचा जराही विचार न करता, ऑस्ट्रेलियाविरुद्ध दाखवलेला मानसिक कणखरपणा अंतिम सामन्यात भारताला पुन्हा दाखवावा लागेल.
siddharth.khandekar@expressindia.com