जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गुरुवारी होणारा तिसरा ट्वेन्टी-२० सामना जिंकत भारताचा प्रयत्न मालिका बरोबरीत राखण्याचा राहील. मात्र, याकरिता भारतीय गोलंदाजांना आपल्या कामगिरीत सुधारणा करावी लागेल. कारण, निवड समितीचे लक्ष पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी योग्य संयोजन तयार करण्याकडेही असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोलंदाजांकडून अपेक्षा

दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात गोलंदाजांना लय सापडली नाही. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार यांनी भरपूर धावा दिल्या. पावसामुळे त्यांचे काम आणखी कठीण झाले. मात्र, दोघांच्या गोलंदाजीमध्ये म्हणावे तसे नियंत्रण पाहण्यास मिळाले नाही. वैयक्तिक कारणांमुळे मालिकेबाहेर गेलेल्या दीपक चाहरची कमतरता संघाला जाणवली. जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीत संघ व्यवस्थापनाला अर्शदीप व मुकेश यांच्यावर विश्वास होता. मात्र, दोघांनीही निराशा केली आणि दबावाच्या परिस्थितीत त्यांना खेळ उंचावता आला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने ४-१ असा मालिका विजय मिळवला असला, तरीही गोलंदाजीतील कमकुवतपणा समोर आला. अर्शदीपने बंगळूरुच्या पाचव्या ट्वेन्टी-२० सामन्यात अखेरचे षटक चांगले टाकले. मात्र, याशिवाय उर्वरित चार सामन्यांत त्याची कामगिरी साधारण राहिली व त्याला चार गडी बाद करता आले. दुसरीकडे, मुकेश कुमारनेही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत खूप धावा दिल्या. ग्वेबेर्हा येथील दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यातही दोघांनी निराशा केली. आता मालिका पराभवापासून वाचण्यासाठी त्यांना गुरुवारच्या सामन्यात चुणूक दाखवावी लागेल.

हेही वाचा >>> Sports Award: अर्जुन पुरस्कारासाठी मोहम्मद शमीच्या नावाची शिफारस, खेलरत्न अवार्डच्या शर्यतीत बॅडमिंटनपटू सात्विक-चिराग

गिल, जैस्वालकडे लक्ष

ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारताला चार सामने खेळायचे आहेत आणि निवड समितीकडे लक्ष वेधण्यासाठी खेळाडूंकडे फारसे सामने नाहीत. एक वर्ष व चार महिन्यांनंतर ट्वेन्टी-२० खेळणाऱ्या रवींद्र जडेजाला प्रभावित करता आले नाही. रिंकू सिंहने या प्रारूपात पहिले अर्धशतक झळकावले आणि त्याचा प्रयत्न अखेरच्या सामन्यात ‘विजयवीरा’ची भूमिका साकारण्याचा असणार आहे. कर्णधार सूर्यकुमारने आणखी एक अर्धशतक झळकावले. भारताचा सलामीवीर शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वालकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा राहील. दोघांनाही गेल्या सामन्यात खातेही उघडता आले नव्हते. जोहान्सबर्ग येथे भारताने तिन्ही सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज जेराल्ड कोएट्झी, मार्को यान्सेन आणि लुंगी एन्गिडी तिसरा ट्वेन्टी-२० सामना खेळणार नाही. कारण, कसोटी मालिकेच्या तयारीसाठी त्यांना प्रथम श्रेणी सामने खेळायचे आहेत.

* वेळ : रात्री ८.३० वा. * थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, हॉटस्टार अ‍ॅप.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs south africa 3rd t20i match prediction zws
First published on: 14-12-2023 at 02:35 IST