भारत-श्रीलंका क्रिकेट मालिका

कोलंबो : आघाडीच्या फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे भारतीय संघ पराभवाच्या छायेत असताना आठव्या क्रमांकावरील दीपक चहर (८२ चेंडूंत नाबाद ६९ धावा) पाहुण्यांसाठी तारणहार ठरला. गोलंदाजीत दोन बळी मिळवणाऱ्या चहरच्या अष्टपैलू योगदानामुळे भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेवर तीन गडी आणि पाच चेंडू राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

श्रीलंकेचे २७६ धावांचे उद्दिष्ट गाठताना पृथ्वी शॉ (१३), इशान किशन (१) यांच्या अपयशामुळे भारतीय संघ ५ बाद ११६ अशा संकटात सापडला होता. सूर्यकुमार यादवने ५३ धावांची खेळी केली. त्यानंतर कृणाल पंडय़ाने ३५ धावांचे योगदान दिले. मात्र महत्त्वाचे फलंदाज माघारी परतल्यामुळे श्रीलंकेला मालिकेत बरोबरी साधण्याची संधी होती. पण चहरने भुवनेश्वर कुमारच्या साथीने आठव्या गडय़ासाठी ८४ धावांची अभेद्य भागीदारी रचत भारताला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, भुवनेश्वर (३/५४) आणि फिरकीपटू यजुर्वेद्र चहल (३/५०) यांनी श्रीलंकेच्या फलंदाजीला वेसण घातल्यामुळे यजमानांना ९ बाद २७५ धावांपर्यंत मजल मारता आली. श्रीलंकेकडून अविष्का फर्नाडो (५०) आणि चरिथ असलंका (६५) यांनी झुंजार अर्धशतके झळकावली. चमिरा करुणारत्नेने अखेपर्यंत नाबाद राहून ३३ चेंडूंत ४४ धावा फटकावल्या. त्यामुळे श्रीलंकेने पावणेतीनशे धावांचा पल्ला गाठला.

संक्षिप्त धावफलक

श्रीलंका : ५० षटकांत ९ बाद २७५ (चरित असलंका ६५, अविष्का फर्नाडो ५०; यजुर्वेद्र चहल ३/५०, भुवनेश्वर कुमार ३/५४) पराभूत वि. भारत : ४९.१ षटकांत ७ बाद २७७ (दीपक चहर नाबाद ६९, सूर्यकुमार यादव ५३, मनीष पांडे ३७; वानिंदू हसरंगा ३/३७)

सामनावीर : दीपक चहर