वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावो आणि भारतीय खेळाडू यांच्यातील संबंध अधिक सलोख्याचे आहेत. आयपीएलच्या सत्रात अनेकदा त्याची प्रचिती आली आहे. सध्या पुन्हा एकदा त्याची अनुभूती येताना दिसते. फक्त यावेळी ठिकाण वेगळे आहे. भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील मोकळ्या वेळेत भारतीय क्रिकेटर्संना ब्रावोने त्याच्या घरी मेजवानी दिली. ब्रावोच्या घरी मेजवानीला गेल्याचा फोटो भारतीय सलामीवीर शिखर धवनने ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. धवनने शेअर केलेल्या फोटोमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे यांच्यासोबत ब्रावो देखील दिसत आहे. टी २० विश्वचषकानंतर ब्रावो चॅम्पियन्स या गाण्यामुळे चांगलाच चर्चेत आला होता.
शिखर धवनशिवाय ब्रावोने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन देखील भारतीय संघातील खेळाडूंसोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये महेंद्रसिंग धोनी आणि भुवनेश्वर कुमार दिसत आहेत. एका फोटोमध्ये महेंद्रसिंग धोनी, धोनीची छोटी मुलगी झीवा याच्यासोबत ब्रावोची आई देखील दिसते. या फोटोला ब्रावोने कॅप्शन दिले आहे. त्यामध्ये त्याने लिहिलंय की रविवारी रात्री माझा भाऊ महेंद्रसिंग धोनी, त्याची मुलगी आणि माझी आई आम्ही एकत्र माझ्या घरामध्ये होतो. हा क्षण खूपच आनंददायी असा होता. भुवनेश्वरसोबतच्या फोटोला कॅप्शन देताना ब्रावोने आयपीएलच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आयपीएलच्या सत्रात दोनवेळा पर्पल कॅपचे मानकरी ठरल्याचा उल्लेख त्याने कॅप्शनमध्ये केलाय.
काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये ब्रावो, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि युवा भारतीय खेळाडूंसोबत दिसला होता. भारतीय संघ वेस्ट इंडिजला दाखल झाल्यानंतर धोनी आणि संघाचे स्वागत करण्यासाठी ब्रावोने ट्विट देखील केल्याचे पाहायला मिळाले होते. धोनीच्या नेतृत्त्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना दिसला आहे. तसेच यंदाच्या आयपीएल सत्रात तो सुरेश रैनाच्या नेतृत्त्वाखाली गुजरात लायन्स संघाडून खेळताना दिसला होता. सध्याच्या वेस्ट इंडिजच्या संघात ब्रावोचा समावेश करण्यात आलेला नाही. तो वेस्ट इंडिजकडून अखेरचा एकदिवसीय सामना हा तीन वर्षांपूर्वी २०१४ साली खेळला आहे.