यंदाच्या वर्षांवर छाप पाडणाऱ्या भारतीय सलामीवीर रोहित शर्माला खंत

इंग्लंडमध्ये झालेली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकण्यात अपयश आल्यामुळे मला आजही दु:ख होते. परंतु त्याव्यतिरिक्त हे संपूर्ण वर्ष माझ्यासाठी अत्यंत लाभदायी ठरले, अशी प्रतिक्रिया भारताचा सलामीवीर रोहित शर्माने व्यक्त केली.

वेस्ट इंडिजविरुद्ध नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेत मालिकावीराचा पुरस्कार मिळवणाऱ्या मुंबईकर रोहितने यंदाच्या विश्वचषकात तब्बल पाच शतके झळकावण्याचा विक्रम केला. वर्षभरात त्याने एकूण १० एकदिवसीय शतके लगावतानाच कसोटीतही सलामीवीर म्हणून दमदार कामगिरी केली.

‘‘निश्चितच हे वर्ष माझ्या क्रिकेट कारकीर्दीतील सर्वोत्तम वर्षांपैकी एक होते. विश्वचषक उंचावण्यात यशस्वी झालो असतो, तर माझा आनंद द्विगुणित झाला असता. मात्र वर्षभरात तिन्ही प्रकारांसाठी भारताच्या विजयात मोलाचे योगदान देता आल्याचे मला समाधान आहे,’’ असे ३२ वर्षीय रोहित तिसऱ्या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाला.

‘‘राहुलसोबत फलंदाजी करताना मजा आली. आम्ही दोघांनीही एकमेकांच्या चौकार-षटकारांचा आनंद लुटला. विशेषत: दडपणाखाली शार्दूल ठाकूरने लगावलेला षटकार या मालिकेतील माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे,’’ असेही रोहितने गमतीने सांगितले.

कोहली, रोहित यांचे स्थान अबाधित

दुबई : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि मर्यादित षटकांच्या सामन्यासाठीचा उपकर्णधार रोहित शर्मा यांनी ‘आयसीसी’ जागतिक एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीतील अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान कायम राखले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील दमदार कामगिरीमुळे यंदाचे वर्ष संपेपर्यंत तरी त्यांच्या स्थानांना अन्य फलंदाजांकडून धोका नाही. कोहलीच्या खात्यात सर्वाधिक ८८७ गुण जमा असून रोहित ८७३ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. याव्यतिरिक्त, लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांनीही लक्षणीय झेप घेतली आहे. राहुलने १७ स्थानांनी आगेकूच करताना थेट ७१वा क्रमांक मिळवला. अय्यरने तब्बल २३ क्रमांकांनी मुसंडी मारून ८१वे स्थान पटकावले आहे.

स्वत:ला सिद्ध केले -जडेजा

विंडीजविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात दडपणाखाली बहुमूल्य खेळी साकारून एकदिवसीय प्रकारातही स्वत:ला सिद्ध केल्यामुळे मी समाधानी आहे, असे मत भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने व्यक्त केले. ‘‘एकदिवसीय सामन्यांत मी खेळू शकतो, हे मला स्वत:लाच सिद्ध करून दाखवून द्यायचे होते. निर्णायक लढतीत माझ्याकडून अष्टपैलू कामगिरी झाली. आगामी वर्षांतही अशाच प्रकारे संघासाठी योगदान देईन,’’ असे जडेजाने सांगितले.