TATA Motors to Give Car to Indian Women’s Cricket Team Players: भारतीय महिला क्रिकेट संघाने महिला विश्वचषकाच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखालील संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत जेतेपद आपल्या नावे केलं. वर्ल्ड चॅम्पियन ठरल्यानंतर सगळ्याच स्तरावरून भारताच्या लेकींचं कौतुक केलं जात आहे. सरकार, बीसीसीआय आणि विविध राज्यं संघातील खेळाडूंसाठी खास पुरस्कार जाहीर करत आहे. याचदरम्यान टाटा मोटर्सने मोठी घोषणा केली आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाने भारतात झालेल्या या विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी केली आणि अखेरीस वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. अंतिम फेरीत टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करत जेतेपद आपल्या नावे केलं. या विजयानंतर भारतीय महिला संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचीदेखील भेट घेतली. यानंतर आता टाटा मोटर्सने प्रत्येक खेळाडूला कार भेट म्हणून देणार असल्याची घोषणा केली आहे.

टाटा मोटर्सने त्यांच्या एका अधिकृत हँडलवर पोस्ट केली आहे की, २०२५ चा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघातील प्रत्येक खेळाडूला कंपनीकडून लाँच केली जाणारी एक नवीन टाटा सिएरा कार दिली जाईल. याची घोषणा करताना कंपनीने कॅप्शनमध्ये लिहिलं “Legend Meets Legends”!!

टाटा मोटर्सची नवी टाटा सिएरा कार २५ नोव्हेंबर रोजी लाँच होणार आहे. या कारच्या पेट्रोल आणि सीएनजी व्हर्जनची शोरूम किंमत सुमारे ११-२० लाख असेल, तर ईव्हीची किंमत २०-२५ लाख आहे. ही लाँच होणारी नवी कार वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला दिली जाणार आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाला बीसीसीआयने विश्वचषकाचं जेतेपद पटकावल्यानंतर ५१ कोटींची स्वतंत्र बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. शिवाय, विजेतेपद जिंकल्यानंतर, भारतीय संघाला आयसीसीकडून ३९.७७ कोटी बक्षीस रक्कम मिळाली. एवढंच नाही तर विश्वचषकात खेळणाऱ्या प्रत्येक संघाला २.२० कोटी रुपये देण्यात आले आहेत. सामना जिंकणाऱ्या संघाला ३० लाख रुपये बक्षीस देण्यात आले.

म्हणजेच भारताने अंतिम सामन्यासह पाच सामने जिंकले आहेत आणि यासाठी टीम इंडियाला १.५० कोटी रूपये आयसीसीकडून मिळाले. याव्यतिरिक्त, विविध राज्याच्या सरकारकडून खेळाडूंसाठी बक्षीस रक्कम जाहीर केली जात आहे.