ऑस्ट्रेलियाची सात धावांनी सरशी; मालिकेत विजयी आघाडी

मुंबई : कर्णधार हरमनप्रीत कौर (३० चेंडूंत ४६ धावा) आणि रिचा घोष (१९ चेंडूंत नाबाद ४०) यांच्या आक्रमक फलंदाजीनंतरही भारतीय महिला क्रिकेट संघाला शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात सात धावांनी पराभूत व्हावे लागले. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी मिळवली आहे.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १८९ धावांचा पाठलाग करताना भारतीय महिलांची सुरुवात चांगली झाली नाही. स्मृती मानधना (१६), शफाली वर्मा (२०) आणि जेमिमा रॉड्रिग्ज (८) माघारी परतल्याने भारताची ३ बाद ४९ अशी स्थिती झाली होती. यानंतर हरमनप्रीत आणि देविका वैद्यने (३२) भारताचा डाव सावरला. या जोडीने केलेल्या ७२ धावांच्या भागीदारीमुळे भारतीय संघ सुस्थितीत पोहोचला आहे. हरमनप्रीतने ४६ धावांच्या खेळीत सहा चौकार व एक षटकार मारत ऑस्ट्रेलियन संघाच्या चिंतेच भर घातली. मात्र, अलाना किंगने हरमनप्रीतला बाद केले. यानंतर घोषने फटकेबाजी करताना भारताच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या. मात्र, दुसऱ्या बाजूने इतरांची साथ न मिळाल्याने भारताला २० षटकांत ५ बाद १८१ अशा धावसंख्येपर्यंतच पोहोचता आले. ऑस्ट्रेलियाकडून अ‍ॅश्ले गार्डनर (२/२०) आणि अलाना किंग (२/२३) यांनी चांगली गोलंदाजी केली.

त्यापूर्वी, प्रथम फलंदाजीस आलेल्या ऑस्ट्रेलियाची सलामीवीर बेथ मूनी (२) लवकर बाद झाली. ताहलिया मॅक्रग्रालाही (९) फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. यानंतर कर्णधार एलिसा हिली (३०) आणि गार्डनरने (४२) संघाला डाव सावरला. यादरम्यान हिलीने दुखापतीमुळे मैदानाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एलिस पेरीने (४२ चेंडूंत नाबाद ७२) आक्रमक खेळ करत ऑस्ट्रेलियाला ३ बाद १८८ अशा धावसंख्येपर्यंत पोहोचवले. तिने आपल्या खेळीत सात चौकार आणि चार षटकार मारले.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया : २० षटकांत ३ बाद १८८ (एलिस पेरी नाबाद ७२, ताहलिया मॅकग्रा ४२; दीप्ती शर्मा २/३५) विजयी वि. भारत : २० षटकांत ५ बाद १८१ (हरमनप्रीत कौर ४६, रिचा घोष नाबाद ४०; अ‍ॅशलेग गार्डनर २/२०, अलाना किंग २/२३)