India Women World Cup 2025 Journey To Final: भारतीय महिला संघाने विश्वचषक २०२५ च्या अंतिम फेरीत धडक मारली असून दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सामना होणार आहे. महिला विश्वचषक २०२५ मध्ये भारतीय संघ चांगली कामगिरी करत फायनलमध्ये पोहोचला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने स्पर्धेतील ७ पैकी ३ सामने जिंकले तर ३ सामने गमावले आणि १ सामना पावसामुळे रद्द झाला. तर सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने सात वेळा वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या ऑस्ट्रेलियाला पराभूत करत अंतिम फेरी गाठली.

भारतीय संघाचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास

भारत वि. श्रीलंका, पहिला सामना

भारतीय संघाने श्रीलंकेविरूद्ध सामन्याने महिला विश्वचषक २०२५ मोहिमेला सुरूवात केली. हा पहिला सामना टीम इंडियाने डीएलएस पद्धतीने ५९ धावांनी जिंकला. श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि पावसाच्या व्यत्ययामुळे सामना ४७ षटकांचा खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना भारताने २६९ धावा केल्या, भारताची टॉप ऑर्डर फेल झाल्यानंतर खालच्या फळीतील दीप्ती शर्मा ५३ धावा व अमनजोत कौर ५७ धावा यांची अर्धशतकं महत्त्वपूर्ण ठरली. तर हरलीन देओलने ४८ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने श्रीलंकेला २११ धावांत सर्वबाद केलं. या सामन्यात दीप्ती शर्माने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या आणि सामनावीर ठरला.

भारत वि. पाकिस्तान दुसरा सामना

भारताचा विश्वचषकातील दुसरा सामना पाकिस्तानविरूद्ध खेळवला गेला आणि या सामन्यातही टीम इंडियाने ८८ धावांनी मोठा विजय मिळवला. पाकिस्तानने नाणेफक जिंकत भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं आणि टीम इंडिया ५० षटकांत २४७ धावा करत सर्वबाद झाली. भारताच्या सर्व फलंदाजांनी या सामन्यात ३० ते ३५ धावांचं योगदान दिलं. तर हरलीन देओलने ४६ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ १५९ धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तानकडून सिद्रा अमीनने सर्वाधिक ८१ धावांची खेळी केली. तर इतर सर्व फलंदाज फेल ठरले. भारताकडून क्रांती गौड, रेणुका ठाकूर यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. यासह क्रांती गौड सामनावीर ठरली.

भारत वि. दक्षिण आफ्रिका तिसरा सामना

भारताला विश्वचषकातील चांगल्या सुरूवातीनंतर दक्षिण आफ्रिकाविरूद्ध सामन्यात पराभवाचा मोठा धक्का बसला. द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं आणि टीम इंडिया २५१ धावा करत सर्वबाद झाली. पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये संघाची उपकर्णधार स्मृती मानधना फेल ठरल्याचा फटका फलंदाजी विभागाला बसला. रिचा घोषने या सामन्यात ९४ धावांची वादळी खेळी केली. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ४९ षटकांत २५२ धावा विजय मिळवला.

आफ्रिका संघाची कर्णधार लॉरा वुल्फार्ट हिने ७० धावांची खेळी केली. तर खालच्या फळीतील फलंदाज क्लोई ट्रायन हिने ४९ धावांची आणि सामनावीर ठरलेली नादिंने दे क्लार्कने ८४ धावांची खेळी करत संघाला ३ विकेट्सने मोठा विजय मिळवून दिला. भारताकडून क्रांती गौड व स्नेह राणा यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.

भारत वि. ऑस्ट्रेलिया, चौथा सामना

ऑस्ट्रेलिया संघाने गट टप्प्यात सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करत भारताविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारताला ४९ षटकांत ३३० धावांवर सर्वबाद केलं. भारताकडून या सामन्यात दोन्ही सलामीवीरांनी उत्कृष्ट कामगिरी केली. प्रतिकाने ७५ धावा तर स्मृतीने ८० धावांची खेळी केली. यानंतर सर्व फलंदाजांनी ३०-४० धावांचं योगदान दिलं. या सामन्यात एनाबेल सदरलँडने ५ विकेट्स घेतल्या.

तर ३३१ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार एलिसा हिलीने १०७ चेंडूत १४२ धावांची वादळी खेळी केली. तर फिबी लिचफिल्ड ४० धावा, एलिस पेरी ४७ धावा आणि नंतर एश्ले गार्डनर हिने ४५ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोठं योगदान दिलं. भारताकडून या सामन्यात श्री चरणीने ३ विकेट्स घेतल्या.

भारत वि. इंग्लंड, पाचवा सामना

इंग्लंड संघाने या सामन्यात टीम इंडियावर अवघ्या ४ धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. टीम इंडियाच्या हा पराभव अक्षरश: जिव्हारी लागला आणि तिथूनच उत्कृष्ट कामगिरी करण्याचं स्फुरण संघात आलं. इंग्लंडचा संघ प्रथम फलंदाजीला उतरला आणि त्यांनी २८८ धावा केल्या, संघाकडून हिदर नाईटने शतकी खेळी केली. तर एमी जॉन्सने अर्धशतक केलं. भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरात स्मृतीने सामन्यात ८८ धावांची खेळी केली. तर कर्णधार हरमप्रीत कौरने ७० धावांची खेळी केली आणि सामना विजयाच्या उंबरठ्यावर आणला, पण दोघीही बाद झाल्या. मानधनाने विचित्र फटका खेळत आपली विकेट गमावली आणि तिथेच सामना पालटला. अखेरच्या षटकांमध्ये भारताला १३ धावांची गरज होती आणि टीम इंडिया फक्त ९ धावा करू शकली आणि सामना गमावला.

भारत वि. न्यूझीलंड, करो या मरो सामना

भारताला सेमीफायनल गाठण्यासाठी न्यूझीलंडविरूद्ध विजय मिळवणं महत्त्वाचं होतं आणि टीम इंडियाने उत्कृष्ट फलंदाजी करत वनडेमधील मोठी धावसंख्या उभारली. या सामन्यात स्मृती मानधना व प्रतिका राव यांनी शतकं झळकावली. दोघींनी २०० अधिक धावांची भागीदारी करत भारताच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. त्यानंतर जेमिमा रॉड्रीग्जने ७६ धावांची खेळी करत संघाला ३४० धावांचा टप्पा गाठण्यात मदत केली. पावसाने सामन्यात व्यत्यय आणल्याने ४४ षटकांता सामना खेळवला गेला आणि न्यूझीलंडचा संघ फक्त २७१ धावा करू शकला. यासह टीम इंडियाने सेमीफायनल गाठली.

भारत वि. ऑस्ट्रेलिया, सेमीफायनल २

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरूद्ध सेमीफायनलमध्ये जेमिमा रॉड्रीग्जच्या शतकी खेळीच्या जोरावर ऐतिहासिक विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना फिबी लिचफिल्डच्या शतकी खेळीच्या जोरावर ३३८ धावा केल्या. याशिवाय एलिस पेरीने ७७ धावा तर गार्डनरने ६३ धावांची खेळी केली. तर भारताकडून सर्व गोलंदाजांनी विकेट्स घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाला सर्वबाद केलं.

प्रत्युत्तरात भारताने जेमिमा रॉड्रीग्जच्या १२७ धावांच्या खेळीच्या जोरावर ३३९ धावांचं लक्ष्य गाठत ऐतिहासिक विजय मिळवला. भारताकडून जेमिमा-हरमनप्रीत यांनी १६८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली, जी सामन्याचा टर्निग पॉईंट ठरली. कर्णधार हरमनने ८९ धावांची शानदार खेळी केली. तर दीप्ती व रिचाने २४-२४ धावांचे योगदान देत जेमिमाला चांगली साथ दिली आणि अखेरीस अमनजोतने विजयी चौकार लगावत टीम इंडियाचा फायनलमधील प्रवेश निश्चित केला.