India Won ICC Womens Cricket World Cup 2025 : दीप्ती शर्माच्या गोलंदाजीवर हरमनप्रीत कौरने नादिन डी क्लर्कचा अफलातून झेल टिपला आणि हरमनप्रीत कौरच्या संघाने महिनाभर सुरू असलेली मोहीम फत्ते करत महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ वर आपलं नाव कोरलं. या विजयासह तिने कपिल देव (१९८३), महेंद्रसिंग धोनी (२००७, २०११) आणि रोहित शर्मा (२०२४) या दिग्गजांच्या मांदियाळीत स्थान मिळवलं आहे. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील अकादमी स्टेडियमवर ३५,००० हून अधिक चाहत्यांच्या साक्षीने हरमनप्रीतने विश्वचषक उंचावला आणि देशभरातील क्रिकेटरसिकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
दरम्यान, या सामन्यावेळी एक आगळावेगळा योगायोग पाहायला मिळाला. अलीकडेच भारताच्या पुरूष क्रिकेट सघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी-२० विश्वचषक उंचावला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज डेव्हिड मिलर याचा अवघड असा झेल टिपला आणि भारताच्या विजयात महत्त्वाचं योगदान दिलं. असाच एक प्रसंग महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाहायला मिळाला. या सामन्यात अमनजोत कौरने दक्षिण आफ्रिकेची शतकवीर फलंदाज लॉरा वूल्व्हडार्ट हिचा अवघड असा झेल तीन प्रयत्नांमध्ये टिपला. अनेकांनी अमनजोतने टिपलेल्या झेलाची सूर्यकुमार यादवने टिपलेल्या डेव्हिड मिलरच्या झेलाशी तुलना केली आहे.
मध्यरात्रीच्या ठोक्याला भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय
दरम्यान, या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने दक्षिण आफ्रिकेची फलंदाज नादिन डी क्लर्क हिचा झेल टिपला आणि भारताने या सामन्यात विजय मिळवला. विशेष म्हणजे तिने हा झेल टिपला तेव्हा मध्यरात्री बरोबर १२ वाजले होते. ठीक मध्यरात्रीच्या ठोक्याला हरमनप्रीतने अप्रतिम झेल टिपला आणि भारताने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी, ठीक मध्यरात्री १२ वाजता भारत स्वतंत्र झाला. त्यावेळी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणाची सुरुवात At the stroke of the midnight hour, when the world sleeps, India will awake to life and freedom (मध्यरात्रीच्या ठोक्यावर, जेव्हा संपूर्ण जग झोपलेलं असेल, तेव्हा स्वातंत्र्याच्या पहाटेसोबत भारत जागा होईल!). अगदी तशाच पद्धतीने मध्यरात्री ठीक १२ वाजता भारताच्या लेकींनी पहिला विश्वचषक जिंकला अशी चर्चा समाजमाध्यमांवर वाचायला मिळत आहे.
