पीटीआय, हाँगकाँग

भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने दोन वर्षांत प्रथमच अंतिम फेरीत धडक मारली. तर, सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने पुरुष दुहेरीत सरळ गेममध्ये विजय नोंदवत हाँगकाँग बॅडमिंटन स्पर्धेच्या (सुपर ५०० दर्जा) अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले.

२३ वर्षीय लक्ष्यने २०२१ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते. हाँगकाँग स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात त्याने जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असणाऱ्या चायनीज तैपेइच्या चोऊ तियेन चेनला २३-२१, २२-२० असे पराभूत केले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील विजेत्या लक्ष्यने जुलै २०२३ मध्ये कॅनडा खुल्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. त्याने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लखनऊमध्ये सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते. जागतिक क्रमवारीत २०व्या स्थानी असणाऱ्या लक्ष्यसमोर आता अंतिम फेरीत चीनच्या दुसऱ्या मानांकित लि शि फेंगचे आव्हान असेल. उपांत्य सामन्याच्या पहिल्याच गेमपासून लक्ष्याला चेनकडून आव्हान मिळाले. दोन्ही खेळाडूंमध्ये सुरुवातीपासूनच चुरस पहायला मिळाली. लक्ष्यने खेळ उंचावत पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये चेनने आपली लय राखत लक्ष्यवर दबाव निर्माण केला. एकवेळ सामना निर्णायक गेममध्ये जाईल, असे दिसत असताना लक्ष्यने गुणांची कमाई करीत गेमसह सामन्यात विजय मिळवला.

त्यापूर्वी, सात्त्विक-चिराग जोडीने जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असणाऱ्या चायनीज तैपेइच्या बिंग-वेई लिन व चेन चेंग कुआन जोडीला २१-१७, २१-१५ असे नमवित अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. भारतीय जोडीसमोर अंतिम फेरीत चीनच्या लियांग वेई केंग आणि वांग चांग यांचे आव्हान असेल. पहिल्या गेमच्या मध्यंतरापर्यंत भारतीय जोडीकडे ११-८ अशी आघाडी होती. भारतीय जोडीने आपली आघाडी वाढवत गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये चायनिज तैपेइच्या जोडीने ४-२ अशी सुरुवात केली. मात्र, भारतीय जोडीने ६-६ अशी बरोबरी साधली. चिरागच्या काही चुकांमुळे चायनीज तैपेइची जोडी १०-८ अशी पुन्हा पुढे गेली. यानंतर भारतीय जोडीने खेळ उंचावत गेमसह सामना आपल्या नावे केला.