नवी दिल्ली : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या अनुपस्थितीत भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी सज्ज होत असतानाच भारताचा प्रमुख फलंदाज केएल राहुल याने अलीकडच्या काळात फलंदाजीतील चुकांमुळेच कसोटी मालिकेत अपयश सहन करावे लागल्याची कबुली दिली.
‘आयपीएल’मधील दिल्ली कॅपिटल्स संघाचे आव्हान संपल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत राहुलने आपली मते स्पष्टपणे मांडली. ‘‘गेल्या काही कसोटी मालिकांत आम्हाला फलंदाजी चांगली करायला हवी होती. फलंदाजांच्या अपयशामुळेच कसोटी क्रिकेटमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला. घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धची मालिका ३-० गमावली, त्यानंतर ऑस्ट्रेलियातही त्याच चुका केल्या,’’ असे राहुल म्हणाला.
घरच्या खेळपट्ट्यांची चांगली माहिती असतानादेखील न्यूझीलंड गोलंदाजांनी आम्हाला शांत ठेवण्याचा मार्ग शोधून काढला. भारतीय फलंदाज धावांसाठी धडपडत होते आणि दबावाखाली खराब फटके खेळून गेले, असेही राहुलने नमूद केले.
खेळपट्टी फिरकीला साथ देणाऱ्या होत्या. आमच्याकडे दर्जेदार फिरकी गोलंदाजी होते. पण, न्यूझीलंडला आमच्यावर दबाब आणणे जमले. आम्ही चांगली फलंदाजी केली असती, तर मालिका वाचवू शकलो असतो, अशीही कबुली राहुलने दिली.
स्वत:च्या फलंदाजी क्रमांकाविषयी बोलताना राहुलने संघाची गरज हाच आपल्या फलंदाजीचा क्रमांक असल्याचे सांगितले. दशकाहून अधिक काळच्या कारकीर्दीत राहुलची संघातील फलंदाजीची जागा निश्चित नाही.
‘‘संघाची गरज ओळखून खेळात बदल करण्यात मी नेहमी तयार असतो. कर्णधार किंवा निवड समितीसमोर बसून मी काय करू शकतो असे सांगणे मला कधी जमले नाही. त्यामुळे समोर येईल त्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा मार्ग कायम निवडला,’’ असे राहुल म्हणाला.
ट्वेन्टी२० विश्वचषक माझे लक्ष्य
राहुलने आपल्याला ट्वेन्टी-२० क्रिकेटसाठी भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवायचे आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा हे माझे लक्ष्य असल्याचे सांगितले. ‘‘खेळ खूप पुढे गेला आहे. वेगवान झाला आहे. त्यामुळे मी कुठे सुधारणा करू शकतो, खेळाशी जुळवून घेण्यासाठी मला काय करावे लागेल, संघात पुन्हा स्थान मिळविण्यासाठी काय करता येईल याचा सध्या मी विचार करत आहे,’’ असे राहुल म्हणाला. यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान संपुष्टात आले असले, तरी राहुलने पाचशेहून अधिक धावा करून आपली छाप पाडली आहे. ‘आयपीएल’मध्ये सहभाग नोंदवताना पाचव्यांदा राहुलने पाचशेपेक्षा अधिक धावा करण्याची कामगिरी केली आहे.
मला फक्त संघात राहायचे आहे. माझ्यासमोर जे काही आव्हान येते त्याचा विचार करण्यापेक्षा मी त्याच्याशी जुळवून घेणे पसंत करतो. – केएल राहुल</strong>