IND vs SA 1st ODI: आजपासून सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील एकदिवसीय सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यावर पावसाचे सावट असल्याने सामना थोडा उशिराने सुरु झाला. भारताचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाऊस झाल्याने षटकांची संख्या कमी करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही संघ प्रत्येकी ४०-४० षटके खेळणार आहेत. यामुळे प्रत्येक गोलंदाज ८ षटके टाकणार आहेत. पहिला पॉवर प्ले हा ८ षटकांचा तर दुसरा आणि तिसरा अनुक्रमे २४ आणि ८षटकांचा असणार आहे.

लखनऊ इथे होणाऱ्या एकदिवसीय सामन्यात पावसाने खोडा घातला. त्यामुळे १ वाजता होणारी नाणेफेक तब्बल अडीच तास उशीराने करावी लागली, परिणामी सामनाही उशीरा सुरू झाला. याआधी टी२० मालिकेत मेन इन ब्लूने २-१ असा विजय मिळवला होता. रोहित शर्मासह टी२० विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या संघात समाविष्ट खेळाडूंच्या अनुपस्थितीत शिखर धवन कर्णधार असेल. तीन सामन्यांच्या टी२०  मालिकेतील हा शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेने ४९ धावांनी विजय झाला.

शिखर धवन याने श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे दौऱ्यावर भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केले आहे. आता तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहे. त्याने आफ्रिकेविरुद्ध २१ एकदिवसीय सामन्यांत ५०.८९च्या सरासरीने ९६७ धावा केल्या आहेत. त्यात ३ शतकं व ६ अर्धशतकांचा समावेश आहे. आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकने भारताविरुद्ध १६ सामन्यांत ६३.३१च्या सरासरीने १०१३ धावा केल्या असून त्यात ६ शतकं व २ अर्धशतकांचा समावेश आहे.

ऋतुराज गायकवाडचे पदार्पण

ऋतुराज गायकवाडने भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आजच्या सामन्यात भारतीय संघ सहा फलंदाज आणि पाच गोलंदाजांसह खेळत आहे. यामध्ये दोन फिरकीपटू आणि तीन वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. नाणेफेकीदरम्यान भारतीय कर्णधार शिखर धवन म्हणाला की खेळपट्टीत ओलावा आहे आणि त्याचा फायदा घ्यायचा आहे.