India vs England 4th Test: लॉर्ड्सच्या मैदानावर झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला २२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात बरंच काही घडलं होतं. शेवटी मोहम्मद सिराजची विकेट चर्चेत राहिली. पण सर्वात जास्त चर्चेत राहिलं ते, शुबमन गिल आणि जॅक क्रॉली यांच्यात झालेली बाचाबाची. या बाचाबाचीनंतर सामन्यातील रोमांच आणखी वाढला. याचा परिणाम आता चौथ्या कसोटी सामन्यात शुबमन गिल फलंदाजीला आला त्यावेळी दिसला.
लॉर्ड्स कसोटीतील तिसऱ्या दिवसाच्या शेवटी जेव्हा इंग्लंडच्या फलंदाजांनी वेळ वाया घालवला होता. त्यावेळी वातावरण चांगलंच तापलं होतं. जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी फलंदाजी करताना वेळ घालवला होता. त्यामुळे कर्णधार शुबमन गिल आणि जॅक क्रॉली यांच्यात बाचाबाची झाली होती. त्यामुळे गिल इंग्लंडच्या चाहत्यांच्या आणि पत्रकारांच्या रडारवर होता.
चौथ्या कसोटीत काय घडलं?
चौथा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी या वादाची चर्चा रंगली होती. याचे पडसाद आता चौथा सामना सुरू झाल्यानंतरही दिसून आले. भारताचा कर्णधार शुबमन गिल फलंदाजीला आला त्यावेळी इंग्लंडचे चाहते त्याला चिडवताना दिसून आले. हे पाहून गिल आश्चर्यचकित झाला. याचा परिणाम त्याच्या फलंदाजीवरही पहायला मिळाला.
गिल या मालिकेत दमदार फॉर्ममध्ये आहे. गिलने एजबस्टनच्या मैदानावर दमदार द्विशतकी खेळी केली होती. गिल या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज देखील आहे. मात्र, गेल्या दोन कसोटीत त्याला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. लॉर्ड्स कसोटीत तो स्वस्तात माघारी परतला होता. आता मँचेस्टर कसोटीतील पहिल्या डावात त्याला चांगली सुरुवात मिळाली होती. पण बेन स्टोक्सचा आत येणारा चेंडू त्याच्या पॅडला जाऊन धडकला. त्यामुळे त्याचा डाव स्वस्तात आटोपला.
भारतीय संघाच्या २०० धावा पूर्ण
या सामन्यात भारतीय संघाला चांगली सुरूवात मिळाली होती. भारतीय संघाकडून केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनी मिळून ९४ धावांची भागीदारी केली. यशस्वी जैस्वालने ५८ तर केएल राहुलने ४६ धावांची खेळी केली. शुबमन गिल १२ धावांवर माघारी परतला. तर पंत आणि साई सुदर्शनने भागीदारी करून संघाची धावसंख्या २०० पार पोहोचवली आहे.