दुबई : भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचा कर्णधार म्हणून पहिले आंतरराष्ट्रीय जेतेपद पटकावल्यानंतरही विजयी चषक न मिळाल्याने सूर्यकुमार यादव निराश होता. क्रिकेट खेळायला लागल्यापासून विजेत्या संघाला चषक न दिल्याचे याआधी कधीही पाहिले नव्हते, असे वक्तव्य सूर्यकुमारने केले. मात्र, माझा संघच माझ्यासाठी सर्वांत मोठे चषक असल्याचे म्हणत सूर्यकुमारने आपली निराशा लपविण्याचा प्रयत्न केला.

पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर मात करत भारतीय संघाने आशिया चषक ट्वेन्टी-२० स्पर्धेचे जेतेपद पटकावले. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने या स्पर्धेत सर्वच प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवले. भारताने आपले सातही सामने जिंकले, ज्यात पाकिस्तानवरील तीन विजयांचा समावेश होता. जेतेपदानंतर भारतीय संघाने आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून चषक घेण्यास नकार दिला.

नक्वी हे पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष आणि पाकिस्तान सरकारमध्ये गृहमंत्रीही आहेत. त्यांनी समाजमाध्यमांवरून वारंवार भारतविरोधी भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या हातून आपण चषक स्वीकारणार नाही, अशी भारताने भूमिका घेतली. मग नक्वी यांनी थेट आपल्या अधिकाऱ्यांना चषक घेऊन जाण्यास सांगितले. त्यामुळे भारताला चषक मिळालाच नाही.

‘‘विजेत्या संघाला चषक देण्यात न आल्याचे मी याआधी कधीही पाहिले नव्हते. आम्ही खूप मेहनत करून हे जेतेपद मिळवले आहे. ही स्पर्धा जिंकणे सोपे नव्हते. आम्ही ४ सप्टेंबरपासून अमिरातीमध्ये आहोत. आम्ही अंतिम लढतीत खूप चांगले खेळलो. त्यामुळे आम्हाला चषक मिळायला पाहिजे होता, इतकेच मी म्हणू शकतो,’’ असे सूर्यकुमार पत्रकारांच्या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाला.

‘‘तुम्ही केवळ चषकाबाबत बोलत असाल, तर खरा चषक माझ्याबरोबर ड्रेसिंग रूममध्येच आहे. संघातील माझे १४ सहकारी, सर्व प्रशिक्षक, हा माझ्यासाठी खरा चषक आहे,’’ असेही सूर्यकुमारने नमूद केले.

त्यानंतर त्याने समाजमाध्यमावरही आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘‘काही काळाने चषकाबरोबरचे छायाचित्र कोणालाही लक्षात राहत नाही. लोकांच्या लक्षात राहते ते विजेत्यांचे नाव. आम्ही या स्पर्धेतून अनेक आठवणी जमा केल्या आहेत. आमच्यासाठी तोच खरा ठेवा आहे,’’ असे सूर्यकुमारने आपल्या पोस्टमध्ये लिहिले.

सर्व मानधन दान…

– सूर्यकुमारने आशिया चषक स्पर्धेतील सर्व सामन्यांचे मानधन देशातील सशस्त्र दल आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबीयांना दान करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानला हरवून आशिया चषक जिंकल्यावर सूर्यकुमारने समाजमाध्यमावरून हा निर्णय जाहीर केला.

– भारतीय खेळाडूंना ट्वेन्टी-२० प्रारूपातील प्रत्येक सामन्यासाठी चार लाख रुपये मिळतात. म्हणजेच सूर्यकुमार या स्पर्धेतून मिळणारे २८ लाख रुपये दान करणार आहे. या स्पर्धेदरम्यान पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याची भूमिका सूर्यकुमारने घेतली होती. अखेरपर्यंत तो या भूमिकेवर ठाम राहिला.

– पाकिस्तानवरील साखळी सामन्यातील विजय सूर्यकुमारने पहलगाम हल्ल्यात बळी पडलेल्यांना आणि भारतीय सशस्त्र दलांना समर्पित केला होता. त्याची ही कृती राजकीय मानून ‘आयसीसी’ने चौकशीनंतर त्या सामन्यासाठी सूर्यकुमारला मानधनातील ३० टक्के दंड सुनावला होता. ‘बीसीसीआय’ने या निर्णयाला आव्हान दिले आहे.