रणजी ट्रॉफीत आपल्या गोलंदाजीने विरोधी संघाची दाणादाण उडवणारा भारतीय क्रिकेटपटू इकबाल अब्दुल्ला सध्या चर्चेत आहे. इकबाल अब्दुल्ला याने मैदानावर असं काही केलं की, प्रत्येकजण त्याचं कौतूक करत आहे. झालं असं की, इकबाल अब्दुल्ला रणजी ट्रॉफीमधील सामन्याआधी सराव करत होता. यावेळी त्याची नजर एका मुलावर पडली. भुकेने व्याकूळ मुलगा तिथे झोपला होता. त्या मुलाकडे पाहिल्यानंतर इकबालला राहावलं नाही. त्याने लगेच त्या मुलाला मैदानात बोलावून घेतलं आणि खायला दिलं. इतकंच नाही तर त्याने स्वत:च्या हाताने मुलाला भरवलं. उत्तर प्रदेशातील आझमगडचा इकबाल रणजी ट्रॉफीच्या या हंगामात सिक्कीमकडून खेळत आहे.
इकबालने आपल्या ट्विटर अकाऊंटवर मुलासोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये इकबाल मुलाला ब्रेड भरवताना तसंच चहा पाजताना दिसत आहे. यानंतर इकबालचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
For it is in giving that we receive.#innerpeace #iqqiabdullah #sia . pic.twitter.com/wqfh9Ady6v
— Iqbal abdullah (@iqqiabdullah) December 31, 2019
इकबालला अद्याप भारतीय संघात खेळण्याची संधी मिळालेली नाही. मात्र आयपीएमधील आपल्या कामगिरीने त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. इकबाल आयपीएमध्ये राजस्थान रॉयल्स, आरसीबी आणि कोलकाता संघाचा भाग राहिला आहे. आयपीएमधील ४९ सामन्यांमध्ये इकबालने ४० विकेट्स घेतल्या आहेत. यासोबत त्याने ६३ प्रथम श्रेणी, ८७ अ श्रेणी आणि ९४ टी-२० सामने खेळले आहेत. इकबालच्या नावे १८६ प्रथम श्रेणी विकेट्स, १२१ अ श्रेणी विकेट्स आणि ८१ टी-२० विकेट्स आहेत.