भारतीय क्रिकेट संघ ६ फेब्रुवारीपासून वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. मात्र पहिल्या सामन्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. शिखर धवन, ऋतुराज गायकवाड आणि मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यर या फलंदाजांना करोनाची लागण झाली आहे. हे तिन्ही खेळाडू क्वारंटाइन आहेत.
भारताविरुद्ध वनडे आणि टी-२० मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ आज(बुधवार) सकाळी अहमदाबादला पोहोचला आहे. कायरन पोलार्डच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिज संघ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. यानंतर कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाईल. वनडे मालिकेतील कोणत्याही सामन्यात प्रेक्षकांना मैदानात प्रवेश दिला जाणार नाही. करोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा – वादात सापडला दादा..! BCCIचा अध्यक्ष म्हणून गांगुली करतोय ‘हे’ चुकीचं काम?
या मालिकेतील पहिला सामना ६ फेब्रुवारीला होणार असून हा सामना ऐतिहासिक ठरणार आहे. भारताचा हा १०००वा एकदिवसीय सामना असेल. भारतीय संघ १००० एकदिवसीय सामने खेळणारा पहिला संघ ठरणार आहे. दुसरा सामना ९ फेब्रुवारीला होणार आहे. तिसरा एकदिवसीय सामना ११ फेब्रुवारीला होणार आहे.
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, यजुर्वेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान.