नवी दिल्ली : सध्याच्या पिढीतील क्रिकेटपटूंची मैदानावरील वर्तणूक, आक्रमक हावभाव आणि प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना अपमानित करण्याची कृती अतिशय निंदनीय आहे. त्यांनी या सगळ्या गोष्टींपेक्षा खेळावर अधिक लक्ष दिले तरच बरे, असे परखड मत भारताचे माजी क्रिकेटपटू आणि १९८३ सालच्या विश्वविजेत्या संघाचे सदस्य सय्यद किरमाणी यांनी व्यक्त केले.
नुकत्याच झालेल्या आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत भारताने जेतेपद पटकावले. मात्र, या स्पर्धेत मैदानावरील खेळापेक्षा, भारत आणि पाकिस्तान या संघांतील खेळाडूंच्या विविध कृती, मैदानाबाहेरील राजकारण याचीच चर्चा अधिक रंगली. भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. पाकिस्तानच्या सलामीवीराने अर्धशतकानंतर बॅटचा बंदुकीसारखा वापर करून हवेत गोळ्या झाडल्याची कृती केली. तसेच वेगवान गोलंदाज हारिस रौफने पाकिस्तानी सैन्याने भारताची विमाने पाडल्याचे हातवारे करून दर्शविले. ही बाब खेदजनक असल्याची टिप्पणी किरमाणी यांनी केली आहे.
‘‘मला कोणत्याही देशाचे नाव घ्यायचे नाही, पण सध्या ज्या प्रकारे क्रिकेट खेळले जात आहे, ते योग्य नाही. आता क्रिकेट हा ‘जेंटलमेन्स गेम’ अर्थात सज्जनांचा खेळ उरलेला नाही. खेळाच्या मैदानावर आक्रमक हावभाव केले जात आहेत, प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना अपमानित करण्याची कृती होत आहे. हे अतिशय निंदनीय आहे. मी हे केवळ आशिया चषकाबाबत बोलत नाही. सध्या जगभरातच हे पाहायला मिळते आहे,’’ असे किरमाणी ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
‘‘आशिया चषकादरम्यान मला मित्रांकडून बरेच संदेश येत होते. ‘भारतीय संघाला काय झाले आहे? खेळाच्या मैदानावर राजकारण कसे घुसले?’ असे प्रश्न ते मला विचारत होते. हे प्रश्न ऐकून माजी खेळाडू म्हणून मला लाज वाटत होती. ‘तुमच्या काळातील क्रिकेट वेगळे होते. त्यावेळी हा खरेच सज्जनांचा खेळ होता. मात्र, आता हे चित्र बदलले आहे,’ असे माझे मित्र मला सांगत होते. ही बाब चांगली नाही,’’ असेही किरमाणी यांनी नमूद केले.
‘‘खेळ आणि राजकारण वेगळेच राहायला हवे. खेळाच्या मैदानाबाहेर जे झाले, ते तिथेच राहायला हवे. मैदानावर आल्यानंतर तुम्ही खेळावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. आमच्या काळात खेळाडूंमध्ये खेळीमेळीचे वातावरण असायचे. मात्र, आता तसे दिसून येत नाही,’’ असेही किरमाणी म्हणाले.
पाकिस्तानच्या शेरेबाजीला जेतेपदाने प्रत्युत्तर – तिलक
हैदराबाद : अंतिम लढतीत पाकिस्तानचे खेळाडू अतिशय आक्रमकपणे वागत होते. खेळपट्टीवर येत असताना त्यांनी मला बरेच सुनावले. मात्र, मी संयम राखला. आशिया चषकाचे जेतेपद हेच त्यांच्या शेरेबाजीचे सर्वोत्तम उत्तर होते, असे वक्तव्य भारताचा फलंदाज तिलक वर्माने केले. तिलकच्या नाबाद ६९ धावांच्या निर्णायक खेळीच्या जोरावर भारताने रविवारी झालेल्या अंतिम लढतीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर पाच गडी राखून मात करताना आशिया चषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले. त्यानंतर तिलकचे दुबईहून हैदराबाद येथे मंगळवारी आगमन झाले. यावेळी चाहत्यांनी जल्लोषात त्याचे स्वागत केले. हे पाहून तो भारावून गेला. तसेच त्याने पत्रकारांशी संवाद साधताना आशिया चषकाच्या अंतिम लढतीचा अनुभव सांगितला. ‘‘सुरुवातीला मला दडपण जाणवत होते. मात्र, मला काहीही करून देशाला सामना जिंकवून द्यायचा होता. लहाणपणापासून मी माझ्या प्रशिक्षकांकडून शिकलेल्या मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित केले. खेळपट्टीवर टिकून राहिलो. आशिया चषक जिंकणे हेच त्यांच्या शेरेबाजीला सर्वोत्तम उत्तर होते,’’ अशी भावना तिलकने व्यक्त केली.