भारतीय हॉकी संघ येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत चांगली कामगिरी करीत किमान उपांत्य फेरीत स्थान मिळवेल, असा आत्मविश्वास भारतीय पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक टेरी वॉल्श व महिलांचे प्रशिक्षक नील हॉवगुड यांनी येथे व्यक्त केला.
वॉल्श म्हणाले, ‘‘उपांत्य फेरीत स्थान मिळविणे हे आमच्यापुढील पहिले ध्येय आहे. त्याकरिता खेळात सातत्यपूर्ण कामगिरी ठेवणे व पेनल्टी कॉर्नरचे गोलात रूपांतर करण्याबाबत अचूकता राखणे यावर आमचा भर राहणार आहे. पेनल्टी कॉर्नरबाबत रुपिंदरपाल सिंग व व्ही.आर.रघुनाथ यांच्यावर आमची भिस्त आहे. आमच्या खेळाडूंनी येथील वातावरणाशी जुळवून घेतले असल्यामुळे त्यांना येथे फारशी अडचण येणार नाही.
गेले एक आठवडा येथे आमच्या खेळाडूंनी भरपूर सराव केला आहे. त्याचा फायदा त्यांना निश्चित मिळणार आहे. संघातील खेळाडूंमध्ये चांगला समन्वय आहे व स्पर्धेत अव्वल यश मिळविण्यासाठी ते उत्सुक झाले आहेत.’’
‘‘महिला संघातील प्रत्येक खेळाडूमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याचा आत्मविश्वास आहे. ग्लासगो आमच्या खेळाडूंनी मैदान व वातावरणाशी जुळवून घेतले आहे. त्यांनी सरावातही चांगली चमक दाखविली आहे त्यामुळे संघाच्या कामगिरीबाबत मी आशावादी आहे,’’ असे हॉवगुड यांनी सांगितले.