अखेरच्या साखळी लढतीत आर्यलडविरुद्ध मोठय़ा फरकाने विजयाची आवश्यकता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आर्यलडला मोठय़ा फरकाने हरवल्यास अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याच्या भारताच्या युवा आणि अननुभवी संघाच्या अंधूकशा आशा जिवंत राहू शकतील. पहिल्या तीन सामन्यांमध्ये प्रभाव दाखवू न शकणाऱ्या भारताने बुधवारी मलेशियाचा ५-१ असा पराभव करून स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. या विजयाआधी अर्जेटिनाने भारताला ३-२ असे नमवले. मग विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाने भारताचा ४-२ असा पराभव केला, तर इंग्लंडने १-१ अशी बरोबरी साधली.

चार सामन्यांत चार विजय नोंदवणाऱ्या ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. आता आर्यलड वगळता बाकी सर्व संघांना अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलियाच्या खात्यावर १२ गुण, तर ऑलिम्पिक विजेत्या अर्जेटिनाच्या खात्यावर ७ गुण जमा आहेत. याशिवाय मलेशिया (६ गुण), इंग्लंड (५ गुण) आणि भारत (४ गुण) हे संघ आशावादी आहेत. सलग चार पराभव वाटय़ाला आलेल्या आर्यलडचे आव्हान संपुष्टात आले आहे.

भारतासाठी अंतिम फेरीचा प्रवास अधिक खडतर असा जर-तरच्या स्वरूपातील असेल. भारताला हे स्वप्न सत्यात आणण्यासाठी सर्वप्रथम आर्यलडला मोठय़ा फरकाने धूळ चारायला हवी. याशिवाय ऑस्ट्रेलियाने अर्जेटिनाला हरवण्याची आवश्यकता आहे, तर मलेशिया-इंग्लंड लढत बरोबरीत सुटायला हवी.

यंदाच्या वर्षांत राष्ट्रकुल, आशियाई क्रीडा स्पर्धासह चार महत्त्वाच्या स्पर्धा होणार आहेत. या पाश्र्वभूमीवर भारताने अनुभवी हॉकीपटू सरदारा सिंगच्या नेतृत्वाखाली युवा आणि अननुभवी खेळाडूंचा संघ अझलन शाहसाठी उतरवला आहे. या स्पर्धाना सज्ज होण्यासाठी भारताचे मुख्य प्रशिक्षक शोर्ड मरीन युवा गुणवत्तेला अजमावत आहेत.

मलेशियाविरुद्धच्या सामन्यात शिलानंद लाक्रा, गरुजत सिंग, सुमित कुमार आणि रमणदीप सिंग यांनी गोल नोंदवले. आर्यलडविरुद्धच्या सामन्यातही अशाच प्रकारे दमदार कामगिरीची मरीन यांची अपेक्षा आहे. २०२०च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेपर्यंत सरदाराला खेळायचे असेल, तर त्याला या स्पर्धेत आपली कामगिरी उंचावण्याची आवश्यकता आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian hockey team needs big win vs ireland
First published on: 09-03-2018 at 01:55 IST