पीटीआय, भुवनेश्वर
अनुभव आणि मायदेशातील अनुकूल वातावरण या बळावर भारतीय पुरुष हॉकी संघाचे गुरुवारी जर्मनीविरुद्धच्या ‘एफआयएच’ प्रो लीग सामन्यात पारडे जड मानले जात आहे. भारतीय संघ या विजयासह गुणतालिकेतील अग्रस्थान अबाधित राखू शकेल.
भारताने आतापर्यंत १० सामन्यांत २१ गुण कमावले आहेत, तर दुसऱ्या स्थानावरील जर्मनीच्या खात्यावर ८ सामन्यांतून १७ गुण जमा आहेत. किलगा स्टेडियमवर होणाऱ्या दुहेरी सामन्यांच्या (१४ आणि १५ एप्रिल) लढतीत जर्मनीला अनुभवी खेळाडूंची उणीव भासू शकेल. त्यांच्या २२ खेळाडूंपैकी सहा जणांनी वरिष्ठ गटात पदार्पण केलेले नाही. परंतु पुढील वर्षी होणारी विश्वचषक स्पर्धा आणि २०२४चे पॅरिस ऑलिम्पिक या दृष्टीने युवा खेळाडूंची फळी जर्मनी तयार करीत आहे. जर्मनीच्या संघातील काही अनुभवी खेळाडू आपल्या क्लबचे सामने खेळण्यात व्यग्र आहेत. हेसुद्धा जर्मनीच्या निर्णयामागील एक कारण आहे.
भारतीय संघाचा आत्मविश्वास मात्र उंचावलेला आहे. कारण भारताने इंग्लंडला पहिल्या सामन्यात शूटआऊटमध्ये ३-२ असे हरवले, तर दुसऱ्या सामन्यात ४-३ अशी धूळ चारली. अमित रोहिदासच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मायदेशात विजयी घोडदौड राखण्यासाठी उत्सुक आहे. जर्मनीला कमी लेखण्याची चूक करू नका, अशी सूचना भारताचा उपकर्णधार आणि ड्रॅग-फ्लिकर हरमनप्रीत सिंगने केली आहे.
• वेळ : सायं. ७.३० वा.
• थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स फस्र्ट