वृत्तसंस्था, नवी दिल्ली

कसोटी आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या एकदिवसीय कारकीर्दीलाही धोका निर्माण झाला आहे. दोन वर्षांनी आफ्रिकेत होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी रोहित आणि विराटचा विचार करण्याबाबत भारतीय संघ व्यवस्थापन साशंक आहे. त्यातच आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) या दोघांना विजय हजारे करंडक या देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धेत खेळण्याची सक्ती करण्याची शक्यता असून ते या सूचनेचे पालन करतात का, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने याच वर्षी चॅम्पियन्स करंडक एकदिवसीय स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. त्यानंतर रोहित आणि विराट हे दोघेही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेले नाहीत. या दोघांनी गेल्या वर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषकातील जेतेपदानंतर क्रिकेटच्या लघुत्तम प्रारूपाला अलविदा केले होते. तसेच काही महिन्यांपूर्वी त्यांनी कसोटीतूनही निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. आता ते केवळ एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार आहेत. मात्र, २०२७च्या विश्वचषकापूर्वी भारतीय संघ एकदिवसीय प्रारूपात मर्यादित सामनेच खेळणार आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षे हे दोघे लय आणि तंदुरुस्ती राखू शकणार का, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याच दृष्टीने ‘बीसीसीआय’ आणि निवड समिती या दोघांना विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेत खेळण्याची सूचना करण्याची दाट शक्यता आहे.

एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, विराट आणि रोहित यांचा २०२७च्या विश्वचषकासाठी विचार केला जाणे अवघड आहे. मात्र, ‘बीसीसीआय’च्या सूत्राने वृत्तसंस्थेशी बोलताना या वृत्ताला दुजोरा देणे टाळले. भारतीय संघ सध्या आगामी आशिया चषक आणि पुढील वर्षीच्या होणारी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा यावर लक्ष केंद्रित करत असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.

‘‘विजय हजारे करंडक स्पर्धा (२४ डिसेंबर २०२५ ते १८ जानेवारी २०२६) सुरू असतानाच भारतीय संघाचे न्यूझीलंडविरुद्ध तीन एकदिवसीय (११, १४, १८ जानेवारी) सामने होणार आहेत. त्यामुळे रोहित आणि विराटला विजय हजारे करंडकात खेळण्याची सूचना करण्यात आली, तरी ते दोन किंवा तीन सामनेच खेळू शकतील,’’ असेही सूत्राने सांगितले.

रोहितच्या निवृत्तीनंतर कसोटी संघाची धुरा शुभमन गिलकडे सोपविण्यात आली. गिलच्या नेतृत्वाखाली अननुभवी भारतीय संघाने खडतर अशा इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. या मालिकेत दोन वेळा भारतीय संघाने पिछाडीवरुन पुनरागमन केले. त्यामुळे गिलच्या नेतृत्वगुणांची निवड समितीला खात्री पटली असून एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्याच्यावर ही जबाबदारी देणे योग्य ठरेल अशी त्यांची धारणा असल्याचे समजते. त्यातच भारतीय क्रिकेटमध्ये प्रतिभावान युवा खेळाडूंचीही संख्या मोठी असल्याने रोहित आणि विराटवर आणखी किती काळ विश्वास दाखवायचा, असा प्रश्न निवड समितीसमोर निर्माण झाला आहे.

भारतीय संघाची पुढील एकदिवसीय मालिका ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगणार आहे. यात रोहित नेतृत्व करणार आणि विराटचाही संघात समावेश केला जाणार हे जवळपास निश्चित आहे. परंतु या मालिकेत चमक दाखविण्यात अपयश आल्यास या दोघांच्या एकदिवसीय संघातील स्थानाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

● रोहित आणि विराट यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये यापूर्वी अप्रतिम कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांची या प्रारूपातील लय जोपर्यंत कायम राहील, तोपर्यंत त्यांना संधी द्यायला हवी, असे मत माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केले.

● ऑस्ट्रेलियाचा आगामी दौरा हा दोन्ही खेळाडूंचा अखेरचा एकदिवसीय दौरा असू शकतो अशी चर्चा आहे. याबद्दल गांगुलीला विचारले असता आपल्याला याबाबत काहीच माहीत नसल्याने प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही असे त्याने सांगितले. या मालिकेला १९ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.

● ‘‘जो चांगला कामगिरी करेल, त्याला संधी मिळेल. विराट आणि रोहित यांनी कामगिरीत सातत्य राखले, तर त्यांना जरूर संघात कायम ठेवले पाहिजे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोहलीने अ-साधारण कामगिरी केली आहे. रोहितचीही कामगिरी काहीशी अशीच आहे. ते दोघेही उत्कृष्ट खेळाडू आहेत,’’ असे गांगुली म्हणाला.

सरावाला सुरुवात : भारतीय संघ ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार असून यात तीन एकदिवसीय सामनेही खेळेल. या मालिकेतून रोहित आणि विराट यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन होण्याची शक्यता आहे. या मालिकेच्या दृष्टीने विराटने सरावाला सुरुवात केली आहे. याचे छायाचित्र त्याने काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केले होते. विराट आता इंग्लंडमध्ये वास्तव्यास असून लंडनमध्ये तो सराव करत असल्याचे समजते.