वृत्तसंस्था, हांगझो (चीन)
भारतीय महिला हॉकी संघाने आशिया चषक स्पर्धेला शुक्रवारी थाटात सुरुवात केली. काही प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीतही भारतीय संघाने पहिल्या सामन्यात थायलंडचा ११-० असा धुव्वा उडवला.
भारताकडून उदिता दुहान (३०, ५०व्या मिनिटाला) आणि ब्युटी डुंगडुंग (४५, ५४व्या मि.) यांनी प्रत्येकी दोन गोल केले. मुमताज खान (सातव्या मि.), संगीता कुमारी (१०व्या मि.), नवनीत कौर (१६व्या मि.), लालरेमसियामी (१८व्या मिनिट), थौदाम सुमन देवी (४९व्या मि.), शर्मिला देवी (५७व्या मि.) आणि ऋतुजा पिसाळ (६०व्या मि.) या अन्य खेळाडूंनी एकेक गोल केला.
भारतीय महिला खेळाडूंनी सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. पहिल्या अठरा मिनिटांत चार आणि पूर्वार्धाच्या अखेरच्या मिनिटाला एक असे पाच गोल करून मध्यंतरालाच भारताने ५-० अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात अखेरच्या पंधरा मिनिटांत भारताने सहा गोल करून मोठ्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताच्या खेळात कमालीची अचूकता होती. भारताने नऊ पेनल्टी कॉर्नर मिळविले आणि पाचवर त्यांनी गोल केले. प्रतिस्पर्धी थायलंडला त्यांनी एकही कॉर्नर मिळू दिला नाही.
भारतीय संघ अनुभवी गोलरक्षक सविता पुनिया आणि ‘ड्रॅगफ्लिकर’ दीपिका या दोन प्रमुख खेळाडूंशिवाय खेळत आहे. भारताचा आता शनिवारी जपानशी सामना होईल.
अंतिम फेरीतील प्रवेशासाठी पुरुष संघ उत्सुक
राजगीर (बिहार) – एका पावलावर असलेला अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित करण्यासाठी भारतीय पुरुष संघ आज, शनिवारी आशिया चषक हॉकी स्पर्धेतील ‘अव्वल चार’ फेरीमध्ये चीनशी खेळणार आहे.
या फेरीत भारताविरुद्धची बरोबरी आणि चीनविरुद्धच्या पराभवामुळे गतविजेत्या कोरियाचे आव्हान संपुष्टात आले आहे. आता गटातील पहिल्या दोन क्रमांकांसाठी भारत, चीन, मलेशिया संघांमध्ये चुरस आहे. भारताचे दोन सामन्यांत चार गुण झाले असून, चीन, मलेशियाचे प्रत्येकी तीन गुण आहेत. त्यामुळे भारताला रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीच्या सामन्यात प्रवेश करण्यासाठी चीनविरुद्ध बरोबरीही पुरेशी ठरणार आहे.
कोरियाविरुद्ध दमदार कामगिरी केल्यानंतर भारताने मलेशियाविरुद्ध अधिक जिद्द आणि दृढनिश्चयाने खेळ केला. आता चीनविरुद्ध अष्टपैलू कामगिरी करून भारत अंतिम फेरीच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब करण्याच्या इराद्यानेच उतरेल यात शंका नाही.
वेळ : सायं. ७.३० वा.
थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स टेन १