Pooja Vastrakar’s Controversial Post Viral : भारतीय महिला क्रिकेट संघाची अष्टपैलू खेळाडू पूजा वस्त्राकरच्या इन्स्टाग्रामवर शुक्रवारी ‘वसुली टायटन्स’ नावाची पोस्ट शेअर करण्यात आली होती. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जेपी नड्डा आणि इतर भाजप नेत्यांची खिल्ली उडवली होती. मात्र, ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच ती डिलीट करण्यात आली. तरीही, युजर्सनी त्याचा स्क्रीनशॉट घेतला आणि आता पूजा वस्त्राकरला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. मात्र, पूजाने याबाबत माफीही मागितली आहे.

पूजाने मांडली आपली बाजू –

पूजा वस्त्राकरच्या अकाउंटवरून पोस्ट डिलीट केल्यानंतर आणखी एक पोस्ट शेअर करण्यात आली. त्यात लिहिले आहे, “माझ्या इन्स्टाग्रामवरून एक आक्षेपार्ह फोटो शेअर केल्याचे मला समजले आहे. माझ्याजवळ माझा फोन नसताना हे घडले. मला एवढेच सांगायचे आहे की या पोस्टशी माझा काहीही संबंध नाही. मी मनापासून पंतप्रधानांचा आदर करते. या फोटोमुळे भावना दुखावल्याबद्दल मी माफी मागते.”

अष्टपैलू खेळाडू पूजा वस्त्राकर मध्य प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळते. अष्टपैलू पूजा ही उजव्या हाताची मध्यम वेगवान गोलंदाज आणि उजव्या हाताची फलंदाज आहे. तिने २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

हेही वाचा – IPL 2024 : राजस्थानविरुद्धच्या सामन्यात रिकी पाँटिंगने पंचाशी घातला वाद, काय होतं कारण? जाणून घ्या

पूजा वस्त्राकरची कारकीर्द –

पूजा वस्त्राकर नुकतीच महिला प्रीमियर लीग २०२४ मध्ये खेळताना दिसली होते. मुंबई इंडियन्सची ही अष्टपैलू खेळाडू या स्पर्धेत विशेष काही करू शकली नाही. दुसऱ्या सत्रात तिने ५५ धावा केल्या आणि ५ विकेट्स घेतल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पूजाच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर तिने ४ कसोटीत १११ धावा केल्या आहेत आणि १४ बळी घेतले आहेत. तिच्या नावावर ३० एकदिवसीय सामन्यांमध्ये ५५४ धावा आणि २३ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, ५८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पूजाने ३०५ धावा केल्या असून ४० विकेट्सही घेतल्या आहेत.