- भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजची मागणी
‘‘पुरुष क्रिकेटपटूंइतके मानधन मिळायला हवे, अशी मी कधीच मागणी केली नाही. पुरुष क्रिकेटमधून भारतीय नियामक क्रिकेट मंडळाला (बीसीसीआय) मिळणारा महसूल हा अधिक असतो. त्याचा निम्मा महसूलही महिला क्रिकेटमधून मिळत नाही. त्यामुळे त्यांच्याएवढय़ा मानधनाची मागणी करणे चुकीची आहे; पण सन्मानजनक मानधनाची मागणी करणेही गैर नाही,’’ असे स्पष्ट मत भारतीय महिला क्रिकेट संघातील अनुभवी खेळाडू मिताली राजने व्यक्त केले. महिलांना मिळणारे मानधन हे रणजी क्रिकेटपटूंपेक्षा कमी असते का, या प्रश्नावर मिताली फक्त हसलीच. मितालीच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर भारताने आशियाई ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेत पाकिस्तानला नमवून सलग सहाव्यांदा जेतेपद पटकावले. भारताने आशियाई देशांमधील मक्तेदारी कशी कायम राखली आहे, याबाबतही मिताली सांगत होती. त्याच वेळी पाकिस्तानसोबत कोणतीही मालिका न खेळण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचेही तिने सांगितले. ‘महिला क्रिकेटमधील तेंडुलकर’ अशा टोपणनावाने प्रसिद्ध असलेल्या मितालीशी केलेली खास बातचीत-
* आशियाई देशांमधील मक्तेदारी कायम राखण्यात भारताने यश मिळवले. त्यामध्ये तुझे योगदान अमूल्य होते. या स्पध्रेबाबत आणि जेतेपदाबाबत काय सांगशील?
सलग सहाव्यांदा आशिया चषक जिंकल्याचा आनंद आहेच. या निकालावरून भारतीय महिलांचा आशियाई देशांमध्ये असलेला दबदबा अधोरेखित होतो. ही आशिया चषक स्पर्धा यापूर्वीच्या स्पध्रेपेक्षा निराळी आणि आव्हानात्मक होती. या स्पध्रेत सहभागी होणाऱ्या पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश या संघामध्ये उल्लेखनीय प्रगती दिसत आहे. पहिल्या आशिया चषक स्पध्रेत आम्ही श्रीलंकेविरुद्ध खेळलो, दुसऱ्या हंगामात पाकिस्तान सहभागी झाले, परंतु तो संघ नवखा होता. तेव्हापासून ते आत्तापर्यंत या संघांच्या प्रगतीचा आलेख चढाच राहिला आहे. त्यामुळे आमच्यासमोरील आव्हाने वाढली होती.
* या स्पध्रेत पाकिस्तानशी दोन वेळा सामना झाला आणि दोन्ही लढतींत भारताने विजय मिळवला. त्यामुळेच कदाचित या जेतेपदाचा गोडवा अजून वाढला आहे का?
विश्वचषक स्पध्रेत पाकिस्तानविरुद्ध डकवर्थ-लुईस नियमानुसार आम्हाला दोन धावांनी पराभव पत्करावा लागला होता. ती लढत पूर्ण खेळली असती तर कदाचित निकाल आमच्या बाजूने लागला असता. विश्वचषक स्पध्रेत पराभूत झाल्यामुळे संघाचा आत्मविश्वास कमी झाला होता. या पराभवातून आम्हाला बाहेर पडता आले नाही. त्यामुळे आशिया स्पध्रेत त्यांच्याविरुद्ध आत्मविश्वासपूर्ण खेळ करण्याचा निर्धार केला होता. तो गमावलेला आत्मविश्वास पूर्ण मिळवण्यासाठी पाकिस्तानविरुद्ध केवळ विजय पुरेसा नव्हता, तर एकहाती वर्चस्वही गरजेचे होते आणि ते गाजवण्यात आम्ही यश मिळवले. पाकिस्तानविरुद्धच्या साखळी आणि अंतिम सामन्यातील सामन्याचे दडपण वेगळे असते.
* भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धच्या लढतीवर बहिष्कार घालणार अशा चर्चा होत्या, पण तुम्ही खेळण्याचा निर्णय घेतला आणि विजय मिळवत तो निर्णय सार्थ ठरवला. त्याबाबत काय सांगशील?
जिथे केवळ पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये द्विदेशीय मालिका असेल तर तिथे खेळणे उचित नाही. जोपर्यंत दोन्ही देशांमधील परिस्थिती सुधारत नाही, तोपर्यंत अशी मालिका खेळणे योग्य नाही; पण आशिया चषक, विश्वचषक अशा स्पर्धामध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळावे लागते, त्याला हरकत घेता येत नाही, कारण साखळी किंवा अंतिम सामन्यात त्यांच्याशी सामना होऊ शकतो. त्या वेळी काहीच पर्याय तुमच्यासमोर नसतो.
* या स्पध्रेनंतर तुझ्या आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसबाह उल-हक यांच्या आकडेवारीची तुलना करणारा संदेश समाजमाध्यमांवर फिरत होता. त्यामध्ये तुझ्या एकदिवसीय कारकीर्दीची आकडेवारी ही मिसबाहपेक्षा सरस आहे. याबाबत तुझे मत काय आहे?
पुरुष आणि महिला क्रिकेटपटू यांच्यात तुलना करताच कामा नये. पुरुषांच्या क्रिकेटचा दर्जा हा महिलांच्या तुलनेत उच्चस्तरीय आहे. त्यांना जास्त सामने खेळायला मिळतात, वर्षभरात त्यांचे अनेक दौरे होतात. भारतीय संघाचेच सांगायचे झाल्यास त्यांनी वर्षभरात किती कसोटी सामने खेळले आहेत तितके सामने मी माझ्या संपूर्ण कसोटी कारकीर्दीत खेळलेली नाही. हा सर्व विचार केल्यास तुलना होताच कामा नये. त्यामुळे महिला व पुरुष क्रिकेटपटूंच्या आकडेवारीच्या मी विरोधात आहे; पण कौतुक किंवा आभार मानताना, पुरस्काराबाबत समानता असायला हवी. पुरुष क्रिकेटपटूला पुरस्कार देताना महिला क्रिकेटपटू आणि त्यांच्या आकडेवारीची तुलना करणे चुकीचे आहे. माझ्यासोबत अशी घटना घडली आहे. २००७ सालापूर्वी विश्वविक्रम केला त्या वेळी माझ्या कामगिरीची तुलना पुरुष क्रिकेटपटूंच्या आकडेवारीशी करण्यात आली. महिलांचे क्रिकेट सामनेच कमी होतात आणि त्यामुळे ही तुलना पटण्यासारखी नव्हती. आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटूला पुरुष क्रिकेटपटूंसारखाच सन्मान मिळायला हवा, परंतु तुलना होता कामा नये.
* नव्या कराराबाबत महिला क्रिकेटपटू नाराज दिसतात. त्यांच्या नाराजीचे कारण काय?
नाराज वगैरे काही नाही. आमची मागणी एवढीच आहे की, सन्मानजनक मानधन मिळायला हवे. आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटपटूंइतके मानधन मिळावे, असे मी कधीच म्हणत नाही, कारण वर्षांत ते जेवढे सामने खेळतात, त्या तुलनेत आमचे सामने नक्कीच कमी असतात. दुसरी गोष्ट त्यांच्या सामन्यातून बीसीसीआयला मिळणारे महसूलही अधिक असते. महिला क्रिकेट सामन्यांचे प्रक्षेपण होत नाही. त्यामुळे अनेकांना बऱ्याचदा मालिकांविषयी लोकांना माहीतही नसते. त्यामुळे महसूल फार कमी मिळतो. आम्हीही आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत. त्याचा मान राखून मानधनात वाढ झाली पाहिजे. आता बीसीसीआयकडून मिळालेल्या केंद्रीय करारात चांगल्या सुविधा पुरवण्यात आल्या आहेत आणि त्या पुरुष क्रिकेटपटूंना पुरवण्यात आलेल्या सुविधांसारख्याच आहेत.
* मागील ९-१० वर्षांत महिला क्रिकेटचा दर्जा पाहिजे तितका वाढलेला नाही. त्यासाठी काय करता येईल, असे तुला वाटते?
महिला क्रिकेटचा दर्जा उंचावण्यासाठी वर्षांच्या वेळापत्रकाचे योग्य नियोजन व्हायला हवे. उदाहरणार्थ जानेवारीत एक मालिका खेळल्यानंतर मार्चमध्ये दुसऱ्या मालिकेचे आयोजन झाले पाहिजे. त्यानंतर जून-जुलै, सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीत मालिकांचे आयोजन करायला हवे. त्यामुळे खेळाडूंनाही तयारी करायला वेळ मिळतो. नाही तर अनेकदा वर्षांच्या सुरुवातीला एक मालिका खेळल्यानंतर दुसऱ्या मालिकेसाठी वर्षअखेरची वाट पाहावी लागते. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर आम्ही चार महिन्यांनी मालिका खेळलो. जितक्या जास्त मालिकांचे आयोजन करता येईल तितकाच महिला क्रिकेटचा दर्जाही उंचावला जाईल. त्याचबरोबर महिला क्रिकेट सामन्यांचेही प्रक्षेपण व्हायला हवे. त्यामुळे महिला क्रिकेटपटूंना लोक ओळखतील, त्यांनाही थोडी प्रसिद्धी मिळेल.