नोवी साद (सर्बिया) : भारताच्या सुजीत कलकल याने युवा (२३ वर्षांखालील) जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. फ्री-स्टाइल विभागातील ६५ किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत सुजीतने उझबेकिस्तानच्या उमिदजोन जालोलोव्ह याच्यावर तांत्रिक वर्चस्वावर १०-० अशी मात केली.

सुजीतने १० गुणांची कमाई करताच पंचांनी लढत थांबवत नियमानुसार त्याला विजयी घोषित केले. त्या वेळी लढतीची दोन मिनिटे शिल्लक होती. या वर्चस्वासह सुजीत गतवर्षीच्या स्पर्धेतील पदकाचा रंग बदलण्यात यशस्वी ठरला. गेल्या स्पर्धेत सुजीत कांस्यपदकाचा मानकरी ठरला होता. आता युवा आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो अमन सेहरावत (२०२२) आणि चिराग चिकारा यांच्यानंतर तिसरा भारतीय कुस्तीपटू ठरला आहे.

सुजीतने या वर्षीच्या स्पर्धेत प्रत्येक लढतीत आपले वर्चस्व राखले होते. पहिल्या दोन फेरीत त्याने अनुक्रमे मोल्डोवाचा फियोडोर सेव्दारी आणि पोलंडचा डॉमिनिक याकूब यांच्यावर तांत्रिक आघाडीवरच मात केली होती. उपांत्यपूर्व फेरीत ०-२ अशा पिछाडीनंतर त्याने बशीर मॅगोमेडोव्ह याचा ४-२ असा पराभव केला, मग उपांत्य फेरीत जपानच्या तगड्या युटो निशिऊची याच्यावर ३-२ अशी मात केली.

या स्पर्धेत भारताच्या मुलींनी चमकदार कामगिरीसह दहापैकी सात वजनी गटांतून (दोन रौप्य, पाच कांस्य) पदकांची कमाई करून सर्वसाधारण विजेतेपदापर्यंत मजल मारली होती. मुलांना मात्र ग्रीको-रोमन आणि फ्री-स्टाइल अशा दोन विभागांतून केवळ एकाच सुवर्णपदकाची कमाई करता आली. फ्री-स्टाइल विभागात सुजीतचा अपवाद वगळता दोन कुस्तिगीर कांस्यपदकाच्या लढतीत खेळले, पण त्यांना अपयश आले. ग्रीको-रोमन प्रकारात भारताचे सर्व कुस्तिगीर पहिल्याच फेरीत पराभूत झाले.

ऑलिम्पिकसाठी दावेदार…

सुजीतचे हे पहिलेच जागतिक विजेतेपद ठरले. यापूर्वी त्याने २३ वर्षांखालील स्पर्धेत २०२२ आणि २०२५ मध्ये आशियाई विजेतेपद, तर २० वर्षांखालील स्पर्धेत २०२२ मध्येच आशियाई विजेतेपद मिळविले होते. भारतामध्ये फ्री-स्टाइल प्रकाराच्या ६५ किलो वजनी गटात अनेक वर्षे बजरंग पुनियाने पकड राखली होती. त्यामुळे सुजीतला आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधीसाठी प्रतीक्षा करावी लागली. मात्र आता २०२८ ऑलिम्पिकच्या दृष्टीने त्याच्याकडे संभाव्य पदकविजेता म्हणून पाहिले जात आहे.