नवी दिल्ली : आगामी पाच वर्षांत इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही क्रीडा विश्वातील सर्वात मोठी लीग स्पर्धा म्हणून ओळखली जाईल, असे प्रतिपादन करतानाच ‘आयपीएल’चे नवे अध्यक्ष अरुण धुमाल यांनी भारतीय खेळाडूंवर परदेशातील लीगमध्ये खेळण्यास निर्बंधाच्या भूमिकेवर ‘बीसीसीआय’ ठाम असल्याचे स्पष्ट केले. ‘आयपीएल’ अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर धुमाल यांनी प्रथमच प्रसारमध्यमांशी संवाद साधला. ‘आयपीएल’संदर्भात आम्ही मोठे नियोजन केले आहे. महिलांसाठी स्वतंत्र ‘आयपीएल’ घेण्यासाठीही ‘बीसीसीआय’ कटिबद्ध आहे. परदेशातील लीगमध्ये भारतीय खेळाडूंना खेळण्यास निर्बंध कायम असतील, असे धुमाल म्हणाले. प्रत्येक सामन्याचे आर्थिक मूल्य बघितल्यास ‘आयपीएल’ ही दुसरी मोठी स्पर्धा आहे. ‘आयपीएल’च्या २०२३ ते २०२७ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी प्रक्षेपणाचे हक्क हे ४८,३९० कोटी रुपयांना विकले गेले.
महत्त्वाचे मुद्दे..
- ‘आयपीएल’ ही सध्या तरी १० संघांचीच असेल. यामुळे एका हंगामात आता ९४ सामने होणार आहेत. कमी कालावधीत अधिक सामने शक्य नाहीत.
- ‘बीसीसीआय’शी करारबद्ध असणारे खेळाडू परदेशातील लीगमध्ये खेळणार नाहीत. क्रिकेटचा एकूण व्यग्र कार्यक्रम लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला.
- महिलांसाठी स्वतंत्र ‘आयपीएल’ स्पर्धा पुढील वर्षी मार्चमध्ये होईल. यात पाच संघ असतील. या संघांची विक्री प्रक्रिया अजून सुरु झालेली नाही.
- ‘आयपीएल’चे नियोजन योग्य वेळेत झाल्यास जगभरातील क्रिकेट चाहते प्रत्यक्ष सामने पाहण्यास उपस्थित राहू शकतील.