तारीख : २५ जून १९८३.. स्थळ : लॉर्ड्स.. भारताची विश्वविजेतेपदाला गवसणी.. तो दिवस आठवला की अजूनही भारतीय नागरिकांच्या अंगावर शहारे येतात.. वेस्ट इंडिजचे संस्थान खालसा करून कपिलदेवने इंग्लिशभूमीवर झळाळता विश्वचषक उंचावला होता.. साऱ्या भारतीयांच्या आनंदाला पारावार नव्हता.. लॉर्ड्सवर पसरलेला विशाल जनसागर, दुमदुमणारा आसमंत, फडकणारे तिरंगे, मग देशभर रस्तोरस्ती साजरी झालेली दिवाळी.. त्या आठवणी आजही तमाम भारतीयांच्या मनात कायमच्या घर करून राहिल्या आहेत.. त्या ऐतिहासिक सुवर्णदिनाला मंगळवारी ३० वष्रे पूर्ण होत आहेत. पण महेंद्रसिंग धोनीच्या भारतीय संघाने अखेरच्या चॅम्पियन्स करंडकावर नाव कोरून दोन दिवस अगोदरच जल्लोष सुरू केला आहे. त्यामुळे तूर्तास तरी स्पॉट-फिक्सिंग, सट्टेबाजी, क्रिकेटधुरीणांचे सत्तेचे राजकारण, नैतिकता आणि परस्परविरोधी हितसंबंध यामुळे प्रतिमा डागाळलेल्या भारतीय क्रिकेटला दिलासा मिळाला आहे.
महेंद्रसिंग धोनीच्या यशाचा प्रवास सुरू झाला तो २००७मध्ये. कॅरेबियन बेटांवरील विश्वचषक स्पध्रेतून भारतीय संघ अपयशाचा शिक्का घेऊन आला होता. राहुल द्रविडने आपले कर्णधारपद सोडले होते. त्या वेळी २५ वर्षीय धोनीच्या खांद्यावर भारताच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली होती. २४ सप्टेंबर २००७ या दिवशी वाँडर्सवर भारतीय संघाने कमाल केली आणि पहिलावहिला ट्वेन्टी-२० विश्वचषक भारताने जिंकला. त्यानंतर २०११मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर इतिहास घडला. धोनीसेनेने एकदिवसीय क्रिकेटमधील विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. मग २३ जून २०१३ या दिवशी चॅम्पियन्स करंडकावरही वर्चस्व प्रस्थापित करून धोनीने आणखी एका अत्युच्च आनंदाची भारतीय क्रिकेटरसिकांना भेट दिली.
धोनीची ‘बदला’नीती
अंतिम सामन्यात इंग्लंडचा पराभव करून भारताने अतिशय शानदार पद्धतीने बदला घेतला आहे. ऑगस्ट-सप्टेंबर २०११मध्ये भारतीय संघ इंग्लिश दौऱ्यावर गेला होता, तेव्हा इंग्लंडने कसोटी मालिकेत भारताचा ४-० असा धुव्वा उडवला होता. या पराभवामुळे भारताला जागतिक कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थानसुद्धा गमवावे लागले होते. मग एकदिवसीय मालिकाही इंग्लंडनेच जिंकली होती. याच इंग्लंडच्या संघाने २०१२मध्ये भारतात येऊन तब्बल २८ वर्षांनी कसोटी मालिका २-१ अशा फरकाने जिंकण्याची किमया साधली होती. त्या वेळी धोनीच्या कर्णधारपदापुढे प्रश्नचिन्ह उभे ठाकले होते. परंतु त्यानंतर भारताने इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका ३-२ अशी जिंकली होती. गेल्या दोन वर्षांतील इंग्लंडकडून पत्करलेल्या दारुण पराभवांची परतफेड भारताने चॅम्पियन्स करंडक जिंकून केली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. २०११मध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियातही ४-० असा लाजिरवाणा पराभव पत्करला होता. पण या वर्षी भारताने त्यांनाही ४-० असे हरवत पराभवाचे उट्टे फेडले होते. त्यामुळे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे, असे म्हणता येऊ शकते.
सलामीवीरांची पायाभरणी

चांगला प्रारंभ यातच कोणत्याही कार्याचे अध्रे यश सामावले असते, असे म्हटले जाते. क्रिकेटच्या प्रांतातही चांगली सुरुवात ही विजयाची पायाभरणी मानली जाते. भारताच्या चॅम्पियन्स करंडकाच्या यशात शिखर धवन आणि रोहित शर्मा या जोडीचा सिंहाचा वाटा आहे. वीरेंद्र सेहवाग धावांसाठी झगडत असताना आणि सचिन तेंडुलकरने मागील वर्षांच्या अखेरीस एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यानंतर भारताला नव्या सलामीच्या शिलेदारांचा शोध घेणे क्रमप्राप्त होते. आघाडीचा फलंदाज गौतम गंभीर आपल्याकडे उपलब्ध होता. पण त्याचाही फॉर्मशी झगडा सुरूच होता. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत धोनीने रोहित शर्माला सलामीला पाठविण्याचा अभिनव प्रयोग सर्वप्रथम केला. त्या वेळी शर्माने दोन सामन्यांत ८७ धावा करत धोनीचा विश्वास सार्थ ठरवला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला शिखर धवनच्या रूपाने एक धडाकेबाज फलंदाज मिळाला. त्याने आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात आपल्या झंझावाती फलंदाजीने साऱ्यांच्याच डोळ्यांचे पारणे फेडले. दरम्यानच्या काळात गंभीरसाठीही भारतीय संघाचे दरवाजे बंद झाले. चॅम्पियन्स करंडकात सचिनची जागा मुंबईच्याच रोहितने तर वीरूची जागा दिल्लीच्याच धवन याने घेतली. या जोडीने प्रत्येक सामन्यात दमदार सलामी नोंदवली. शिखरने दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावले, तर रोहितने दोन अर्धशतके साजरी केली. ट्वेन्टी-२० षटकांच्या अंतिम सामन्यात या जोडीने केलेली १९ धावांची भागीदारी वगळल्यास या जोडीने ९०.७५च्या सरासरीने सलामीची भागीदारी केली आहे.
 गोलंदाजांचे कर्तृत्व

भारताची फलंदाजी हेच भारताच्या यशाचे गमक असे मांडता येणार नाही. कारण भारताचा वेगवान मारा आणि फिरकी गोलंदाजांनाही विजयाचे तितकेच श्रेय जाते. भारताच्या चॅम्पियन्स करंडकामधील पाच सामन्यांपैकी चार सामन्यात गोलंदाजांनी सामनावीर किताब प्राप्त केला आहे, हेच गोलंदाजांचे खरे यश आहे. धोनीच्या संकल्पनेतल्या ‘सर’ रवींद्र जडेजाने आपल्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीने इंग्लिश वातावरणातही कमाल केली. त्याने पाच सामन्यांत सर्वाधिक १२ बळी घेत दोनदा सामनावीर किताब जिंकला. झहीर खानच्या अनुपस्थितीत इशांत शर्माने वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व समर्थपणे सांभाळले. त्याने एकंदर १० बळी घेत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात सामनावीर किताबही जिंकला. भुवनेश्वर कुमारनेही टिच्चून गोलंदाजी केली आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ८-२-१९-२ असे गोलंदाजीचे पृथक्करण राखत सामनावीर पुरस्कार प्राप्त केला. भारताने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ३०५ धावांत गुंडाळले, दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजची ९ बाद २३३ अशी अवस्था केली, तर तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा १६५ धावांत खुर्दा केला. त्यानंतर उपांत्य सामन्यात श्रीलंकेला ८ बाद १८१ धावसंख्येवर रोखले तर अंतिम सामन्यात यजमान इंग्लिश फलंदाजांना ‘फिरकी’ वेसण घालत ८ बाद १२४ धावांवर सीमित ठेवले.
तात्पर्य
कप्तान धोनीच्या संकल्पनेतील भारतीय क्रिकेटची संक्रमणावस्था आता संपली आहे. जुनी पाने गळून त्यांची जागा नव्या चणीच्या शिलेदारांनी आत्मविश्वासाने घेतली आहे. २०११चा विश्वचषक जिंकून दोन वष्रे दोन महिने झाले आहेत. त्या विश्वविजेत्या संघातील धोनी, कोहली, रैना आणि अश्विन हे फक्त चार खेळाडू सध्या भारतीय संघात उरले आहेत. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही प्रांतांमध्ये सरस असलेल्याचे भारताने इंग्लंडमध्ये सिद्ध केले आहे. २०१५च्या विश्वविजेतेपदाचे स्वप्न उराशी बाळगून हा वय वष्रे २६ अशी सरासरी असणारा भारतीय संघ आता वेस्ट इंडिजच्या स्वारीवर तिरंगी स्पर्धा जिंकण्यासाठी निघाला आहे.