नवी दिल्ली : भारताचे आघाडीचे कुस्तीगीर विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी केंद्र सरकारच्या लक्ष्य ऑलिम्पिक व्यासपीठ योजनेअंतर्गत (टॉप्स) परदेशी प्रशिक्षणासाठी अर्थसाहाय्य मिळाले, पण या दोघांनी प्रशिक्षणासाठी परदेशात जाण्यास नकार दिला आहे. कुस्तीगिरांच्या भूमिकेबाबत क्रीडा मंत्रालय आणि क्रीडा प्राधिकरण यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीपासून क्रीडा मंत्रालय आणि कुस्तीगीर यांच्यातील नाराजीनाटय़ाला सुरुवात झाली. या नाराजीनाटय़ाचा नवा अंक कुस्तीगिरांच्या नव्या भूमिकेतून पाहायला मिळाला.

ब्रिजभूषण यांची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त करताना आम्हाला विचारले नाही हा या नाराजीनाटय़ाचा पहिला अंक होता. त्यावर क्रीडा मंत्रालयाने समितीत बबिता फोगटची निवड करून कुस्तीगिरांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही चौकशी पूर्ण होईपर्यंत आंतरराष्ट्रीय स्पर्धात सहभागी व्हायचे नाही, अशी भूमिका कुस्तीगिरांनी घेतली. ही भूमिका अजून कायम आहे. दोन आंतरराष्ट्रीय मानांकन स्पर्धातून माघार घेतल्यामुळे कुस्तीगिरांना बहुमूल्य गुण गमवावे लागले. सरावाकडेही त्यांचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे आता ऑलिम्पिक पात्रता फेरीत भारतीय मल्लांना सर्वोत्तम कामगिरी करणे अवघड जाऊ शकेल.

दरम्यान, क्रीडा मंत्रालयाने नियुक्त केलेली देखरेख समिती आणि भारतीय ऑलिम्पिक संघटना (आयओए) यांनी ब्रिजभूषण यांची चौकशी केली; परंतु अजूनही अहवाल समोर येत नसल्यामुळे या कुस्तीगिरांच्या नाराजीनाटय़ाचा नवा अंक सुरू झाला. क्रीडा मंत्रालय, क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडून काही उत्तरे मिळत नाहीत. चौकशीतून काय समोर आले याची अजूनही माहिती मिळत नसल्याबद्दल कुस्तीगीर नाराजी व्यक्त करत आहेत. याचाच एक भाग म्हणून आता ‘टॉप्स’कडून अर्थसाहाय्य मिळूनही विनेश आणि बजरंग यांनी परदेशात प्रशिक्षणास जाण्यास नकार दिला अशीच चर्चा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देखरेख समितीच्या अध्यक्ष मेरी कोम फोन उचलत नाहीत. क्रीडामंत्री प्रतिसाद देत नाहीत. आम्हाला न्याय कोण मिळवून देणार? या परिस्थितीत आमच्यासमोर न्यायालयात जाण्यावाचून दुसरा पर्याय नाही.  -विनेश फोगट