बाली : भारताचे आघाडीचे बॅर्डंमटनपटू पी. व्ही. सिंधू आणि किदम्बी श्रीकांत यांनी इंडोनेशिया मास्टर्स सुपर ७५० बॅर्डंमटन स्पर्धेमधील विजयी घोडदौड कायम राखताना शुक्रवारी उपांत्य फेरी गाठली.

या स्पर्धेचे तिसरे मानांकन लाभलेल्या विश्वविजेत्या सिंधूने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत टर्कीच्या नेस्लिहान यिगिटवर ३५ मिनिटांत २१-१३, २१-१० असा विजय मिळवला. सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीपर्यंतचा प्रवास सुकर झाला असला, तरी उपांत्य फेरीत तिच्यापुढे जपानच्या अग्रमानांकित अकाने यामागुचीचे खडतर आव्हान असेल.

पुरुष एकेरीत अनुभवी श्रीकांतने भारताच्याच एचएस प्रणॉयला २१-७, २१-१८ असे नामोहरम केले. पुरुषांमध्ये श्रीकांतने आपल्या जुन्या लयीत खेळ दाखवताना पहिल्या गेममध्ये फक्त सात गुण प्रणॉयला दिले. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या व्हिक्टर एक्सेलसेनवर धक्कादायक विजय मिळवणाऱ्या प्रणॉयने दुसऱ्या गेममध्ये सामना वाचवण्याचा कसोशीने प्रयत्न केला परंतु तो अपयशी ठरला. उपांत्य लढतीत श्रीकांतची डेन्मार्कच्या आंद्रेस अ‍ॅन्टोन्सेनशी गाठ पडेल.