पीटीआय, जकार्ता

सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीने शनिवारी इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या (सुपर १००० दर्जा) अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत भारतीय जोडीने पिछाडीनंतर दमदार पुनरागमन करताना कोरियाच्या मिन ह्युक कांग आणि सेऊंग जे सेओ जोडीचा पराभव केला.

सातव्या मानांकित सात्त्विक-चिराग जोडीने उपांत्य फेरीत बिगरमानांकित कोरियन जोडीविरुद्ध पहिला गेम गमावला. मात्र, त्यानंतर आपला खेळ उंचावत सात्त्विक-चिरागने एक तास व सात मिनिटे चाललेल्या सामन्यात१७-२१, २१-१९, २१-१८ अशी बाजी मारली. या दोन जोडय़ांमधील झालेल्या पाच सामन्यांत सात्त्विक-चिराग जोडीचा हा तिसरा विजय आहे. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असणाऱ्या भारतीय जोडीने पहिल्यांदा सुपर १००० दर्जा असलेल्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंतिम फेरीत त्यांच्यासमोर इंडोनशियाच्या प्रमुद्या कुसुमवर्धना व येरेमिया एरिक योचे याकूब रामबिटान आणि दुसऱ्या मानांकित मलेशियाच्या आरोन चिया व वूई यिक सोह जोडीदरम्यान होणाऱ्या उपांत्य सामन्याच्या विजेत्याशी होईल. पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत एचएस प्रणॉयला अग्रमानांकित व्हिक्टर अॅक्सेलसेनकडून १५-२१, १५-२१ असा पराभव पत्करावा लागला.