India Beat Pakistan and Keeps unbeaten with 12-0 Record: भारतीय महिला संघाने पाकिस्तानला आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे. टीम इंडियाने वर्ल्डकपमध्ये सलग दुसरा विजय नोंदवला. पाकिस्तान संघाला १५९ धावांवर सर्वबाद केलं आणि शानदार विजय मिळवला. श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर, भारताने आता पाकिस्तानला पराभूत करून आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. या विजयासह, भारताने सलग १२ व्यांदा पाकिस्तानला पराभूत करून आपला विक्रम कायम ठेवला आहे. यासह, विश्वचषकात पाकिस्तान महिला संघावर सलग पाचवा विजय मिळवला आहे.

भारतीय संघाने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हरमनसह संपूर्ण संघ थेट ड्रेसिंग रूमच्या दिशेने निघाला. यासह आशिया चषकातील सामन्यांप्रमाणे महिला विश्वचषकातही भारताच्या महिला संघाने पाकिस्तानी संघातील खेळाडूंशी हस्तांदोलन केलं नाही. तर नाणेफेकीदरम्यानही हरमनप्रीत कौरने फातिमा सनाशी हस्तांदोलन केलं नाही, ना नजरानजर झाली.

नाणेफेक गमावल्यानंतर, टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ५० षटकांत २४७ धावांवर गारद झाला. टीम इंडियाकडून हरलीन देओलने सर्वाधिक ४६ धावा केल्या. २४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानी महिला संघ ४३ षटकांत १५९ धावांवर सर्वबाद झाला आणि टीम इंडियाने पाकिस्तानवर शानदार विजय मिळवला. टीम इंडियाकडून क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. सामन्यादरम्यान मैदानावर प्रचंड प्रमाणात कीटक आल्याने अक्षरश: सामना काही वेळ थांबवण्यात आला होता, जेणेकरून मैदानावर स्प्रे करता येईल.

भारताने दिलेल्या २४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खूपच खराब झाली आणि २६ धावांत त्यांनी तीन विकेट गमावल्या. यानंतर, सिद्रा अमीनने एका टोकाला पाय घट्ट रोवून ठेवत संघाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला पण दुसऱ्या टोकाकडून नियमित अंतराने विकेट पडत राहिल्या. या सामन्यात सिद्रा अमीनने १०६ चेंडूत ८१ धावा केल्या. दरम्यान, आठ पाकिस्तानी खेळाडूंना डावात दुहेरी आकडा गाठता आला नाही.

टीम इंडियाकडून क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा या सर्वात यशस्वी फलंदाज ठरल्या. क्रांतीने तिच्या १० षटकांमध्ये फक्त २० धावा देत तीन विकेट घेतल्या. तर दीप्तीने ९ षटकांत ४५ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. तर स्नेह राणाने १ विकेट घेतली.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला उतरल्यानंतर, भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. स्मृती मानधना तिच्या चांगल्या सुरुवातीचा फायदा घेऊ शकली नाही आणि २३ धावांवर बाद झाली. स्मृती लवकर बाद झाल्याने भारताच्या धावांची गती कमी झाली. त्यानंतर प्रतिका रावल ३१ धावा करत बाद झाली. हरलीन देओलने काही शानदार फटके खेळले पण ती ४६ धावांवर बाद झाल्याने तिचं अर्धशतक हुकलं.

दीप्ती शर्मानेही चांगली सुरुवात केली, पण ती २५ धावांवर बाद झाली. स्नेह राणाने देखील चांगले फटके खेळले. शेवटच्या षटकांमध्ये रिचा घोषने २० चेंडूत ३५ धावांची दमदार खेळी करत भारताला २४७ धावांपर्यंत पोहोचवलं.