India Women vs Pakistan Women Toss Controversy CWC25: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांमधील वादांचा सिलसिला काही थांबत नाहीये. या कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये आता महिलांच्या विश्वचषकात सामना खेळवला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेकीदरम्यान भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हस्तांदोलन केलं नाही. पण टॉसच्या वेळेस मात्र भारताची फसवणूक झाल्याचं म्हटलं जात आहे.
२०२५ च्या पुरुष आशिया कप दरम्यान दोन्ही संघ तीन वेळा आमनेसामने आले आणि प्रत्येक वेळी काही ना काही वाद निर्माण झाले. आता, आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मध्ये भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यानही वाद निर्माण झाला. टॉस दरम्यान दोन्ही कर्णधारांनी हस्तांदोलन केलं नाही, परंतु टीम इंडियाची फसवणूक झाल्याचं म्हटलं जात आहे. टॉस हरल्यानंतरही, पाकिस्तानी कर्णधाराने टॉस जिंकल्याचं घोषित करण्यात आलं.
कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर विश्वचषकाच्या सहाव्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान संघ आमनेसामने होते. भारत-पाकिस्तानचे कर्णधार एकमेकांशी हस्तांदोलन करणार का, यावर सर्वांच्या नजरा होत्या आणि घडलंही तसंच. दोन्ही कर्णधारांनी एकमेकांकडे पाहिलं नाही आणि हस्तांदोलनदेखील केलं नाही.
या हस्तांदोलनाच्या वादामध्ये भारतीय संघाची फसवणूक झाली. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणे उडवताच पाकिस्तानी कर्णधार फातिमा सनाने टेल म्हटलं आणि तिथेच गोंधळ झाला. फातिमाने टेल म्हटलं, पण मॅच रेफरी शँड्रे फ्रिट्झ म्हणाल्या की सनाने हेड्स म्हटलं होतं. नाणे पडताच निकाल हेड्स आला आणि रेफरीने पाकिस्तानला टॉसचा विजेता घोषित केलं.
मैदानावरील रेफरीच्या या चुकीमुळे त्यांच्यावर टॉस फिक्सिंग केल्याचा आरोप केला जात आहे. पाकिस्तानी संघाची साथ दिल्याचं देखील चाहते म्हणत आहेत.
रेफरीची चूक पण पाकिस्तानी कर्णधाराने सत्य माहित असूनही अवाक्षर काढलं नाही
सना फातिमाने सुरूवातीला टेल म्हटलं होतं, त्यामुळे तिच्या कॉलच्या आधारे तिने नाणेफेक गमावली होती. पण, सामनाधिकारी, टॉस प्रेझेंटर मेल जोन्स आणि भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरा यांना ही चूक लक्षात आली नाही. पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे पाकिस्तानी कर्णधारानेही यावर काहीही सांगितलं नाही, कारण तिला माहित होतं की तिने टेल्स कॉल केला होता.