रॉबिन उथप्पा त्या वेळी १२ वर्षांचा होता. एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या राहुल द्रविडची स्वाक्षरी घेण्यासाठी सर्वानाच उत्सुकता होती. रॉबिनच्या आईनेही त्याला द्रविडची स्वाक्षरी घेण्यासाठी जायला सांगितले; परंतु त्या बालकाने नकार देत म्हटले की, ‘‘मी एके दिवशी इतरांना स्वाक्षरी देण्याइतपत मोठा होईन!’’ काही वर्षांनी त्याने आपले बोल खरे ठरवले, कारण स्वत:मधील गुणवत्तेवर त्याचा भरवसा होता. लहानपणीपासूनच त्याचे क्रिकेटवर जिवापाड प्रेम होते. सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा यांच्यासारख्या महान खेळाडूंनी त्याला क्रिकेटपटू होण्याची प्रेरणा दिली. तसेच राहुल द्रविड, मॅथ्यू हेडन यांच्यासारख्या खेळाडूंच्या फलंदाजीने त्याला भुरळ पाडली. स्वत:मधील मोठा क्रिकेटपटू होण्याची ऊर्मी त्याला स्वस्थ बसून देत नव्हती. आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये वडील रेफरी म्हणून कार्यरत असतानाही रॉबिनने स्टिकऐवजी बॅट हाती घेतली. एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० संघाचा अनुभवी गाठीशी असणाऱ्या रॉबिनला आता भारताच्या कसोटी संघातील सलामीवीराचे स्थान साद घालते आहे. आयपीएलच्या सातव्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रॉबिन उथप्पाशी केलेली खास बातचीत

आयपीएलच्या सात हंगामांमध्ये तू चार विविध संघांचे प्रतिनिधित्व केले आहेस. या अनुभवातून तू काय शिकलास?
विविध संघांचा खेळाकडे, सामन्याकडे आणि सरावाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि दैनंदिन नियोजन वेगळे असते. हे आपल्याला आत्मसात करावे लागते. आयपीएल संघासाठी आपले सर्वोत्तम योगदान देऊन मनापासून खेळू शकतो, परंतु जास्त भावनिकता जपून चालत नाही, कारण पुढील हंगामात आपण त्याच संघाकडून खेळू याची खात्री नसते. नव्या संघासोबत जुळवून घेणे मला कठीण गेले नाही; पण हा संघ आपल्यासाठी कायम नसणार, या जाणिवेमुळे मानसिकदृष्टय़ा सज्ज राहावे लागते. सध्या मी प्रतिनिधित्व करीत असलेला कोलकाता नाइट रायडर्सचा संघ व्यावसायिकदृष्टय़ा चालवला जातो. त्यामुळे मला खेळाचा चांगल्या पद्धतीने आनंद लुटता येतो. मागील दोन वष्रे अव्वल दहा फलंदाजांमध्ये मी होतो. या वेळीही तशाच प्रकारे कामगिरी करण्याचे माझे मनसुबे आहेत. संघाला सामना जिंकून देणारी कामगिरी देण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन.

तुला कोलकाता संघातील सहकारी जॅक कॅलिसकडून काय शिकायला मिळाले?
कॅलिस स्वभावाने मितभाषी आहे; परंतु तरीही मी त्याच्याकडे स्वत:हून जाऊन फलंदाजीच्या तंत्राविषयी मार्गदर्शन घेतले. कॅलिससारख्या अनुभवी खेळाडूने कोणताही मुलाहिजा न बाळगता माझ्या शंकांचे समाधान केले. खास करून कसोटी क्रिकेटकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहायचे आणि कशी तयारी करावी, याबाबतचे कानमंत्र कॅलिसने मला दिले.

तुझ्याकडे एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटचा आंतरराष्ट्रीय अनुभव आहे; परंतु कसोटी क्रिकेटबाबत तू किती गांभीर्याने विचार करतोस?
सध्या भारताच्या कसोटी संघातील एका सलामीवीराचे स्थान रिक्त आहे. त्या स्थानाला मी न्याय देऊ शकेन आणि कसोटीमध्ये भारताच्या डावाला सुरुवात करू शकेन, याबाबत मला विश्वास आहे. मागील काही वर्षांत रणजी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२०मध्ये माझी कामगिरी समाधानकारक झाली आहे. आता फक्त मला सिद्ध करण्यासाठी योग्य संधीची गरज आहे. चांगला सलामीवीर म्हणून मोठय़ा धावसंख्येचा पाया रचणे आणि देशाला कसोटी सामने जिंकून देणे, हे ध्येय मी जोपासले आहे.

गेला रणजी हंगाम तुझ्यासाठी चांगला ठरला. या वेळी मात्र मोजक्या सामन्यांतच तू खेळलास?
दुखापतीमुळे मला यंदाच्या रणजी हंगामात उत्तरार्धातील पाच सामन्यांत खेळता आले, पण मी एक शतक आणि दोन अर्धशतकांसह ३७४ धावा करून माझी कामगिरी दाखवून दिली. कर्नाटकसाठी हा हंगाम स्वप्नवत होता. रणजी, इराणी आणि विजय हजारे करंडक या तिन्ही जेतेपदांवर नाव कोरून कर्नाटकने इतिहास घडवला. या विजयांमधील माझ्या कामगिरीचे योगदान मला महत्त्वाचे वाटते.

प्रवीण अमरे यांचे वैयक्तिक मार्गदर्शन तुला किती फायदेशीर ठरते आहे?
अमरे यांना खासगी प्रशिक्षक नेमण्याचा निर्णय माझ्या कारकिर्दीत खूप महत्त्वाचा ठरला. मी गेली ११ वष्रे अमरे यांना ओळखत असल्यामुळे त्यांच्याशी मी मोकळेपणाने बोलू शकतो. त्यामुळे वडीलकीच्या नात्याने ते मला खेळाचे धडे देतात. माझ्या फलंदाजीच्या तंत्रात बदल करण्यासाठी त्यांनी मला मोलाची मदत केली. त्यामुळे माझा खेळ विकसित झाला आणि त्याचा फायदा अर्थातच माझ्या संघाला होतो आहे.