भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा शांत आणि संयमी कर्णधार म्हणून ओळखला जातो. परिस्थिती कशीही असो, धोनी शांतपणे ‘प्लॅन’ आखतो आणि ते राबवतो. मात्र शनिवारी पंजाबविरुद्धच्या सामन्यात धोनीचं एक वेगळं रुप त्याच्या चाहत्यांना पहायला मिळालं. शेवटच्या दोन षटकात विजयासाठी ३९ धावा हव्या असताना धोनीने दिपक चहरला गोलंदाजीसाठी पाचारण केलं. मात्र दिपकने पहिले दोन बॉल नो-बॉल टाकत पंजाबला धावा बहाल केल्या. दुसरा नो-बॉल टाकल्यानंतर अखेर धोनीचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि त्याने चहरपाशी जात त्याला कठोर शब्दात नेमकी कुठे गोलंदाजी करायची हे सांगितलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावर चहरने स्पष्टीकरण दिले आहे. तो म्हणाला, ‘धोनी माझ्यावर खूप चिडला होता. मी केलेली चूक मोठी होती. त्यामुळे मला त्याने खूप गोष्टी सांगितल्या. त्यानंतर माझ्या मनामध्ये पुढे कोणता चेंडू टाकायचा हा विचार सुरु होता. मला कल्पना होती की ते दोन चेंडू मी चुकीचे टाकले होते. पण त्यानंतर मी लगेचच चांगले पुनरागमन केले.

सामन्यानंतर संघातील सर्व खेळाडू माझ्याकडे येऊन माझे अभिनंदन करत होते. ते म्हणाले मी शेवटी चांगली गोलंदाजी केली. धोनीही माझ्याकडे आला आणि हसून मला आलिंगन दिले. तसेच मला शबासकी दिली. महत्वाचे म्हणजे धोनीने मला प्रोत्साहन दिले आणि मला स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यास सांगितली. मी संघाच्या विजयात योगदान दिल्याचा मला आनंद आहे, असेही तो म्हणाला.

धोनीने कठोर शब्दांमध्ये दिलेल्या या सल्ल्याचा दिपक चहरला फायदा झाल्याचं दिसलं. दुसऱ्या नो-बॉल नंतर दिपकने दमदार पुनरागमन केलं. याच षटकात दिपकने डेव्हिड मिलरचा त्रिफळा उडवत एका अर्थाने चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

दरम्यान, चेन्नईकडून 161 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला पंजाबचा संघ 138 धावांपर्यंतच मजल मारु शकला. घरच्या मैदानावर खेळत असताना चेन्नईने पंजाबवर 22 धावांनी मात केली. चेन्नईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना, पंजाबची सुरुवात खराब झाली. भरवशाचा ख्रिस गेल झटपट माघारी परतला. यानंतर मयांक अग्रवालही हरभजन सिंहच्या गोलंदाजीवर माघारी परतला. मात्र यानंतर लोकेश राहुल आणि सरफराज खान यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. या खेळीदरम्यान दोघांनीही आपलं अर्धशतक पूर्ण केलं. मात्र मोक्याच्या षटकांमध्ये धावगती वाढवणं त्यांना जमलं नाही.

याचाच परिणाम म्हणजे, अखेरच्या 4 षटकांमध्ये पंजाबसमोरचं आव्हान वाढलं. त्यातचं चेन्नईच्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकांत टिच्चून मारा करत पंजाबच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. लोकेश राहुल मोठा फटका खेळण्याच्या नादात माघारी परतला. 19 व्या षटकात दिपक चहरने सुरुवातीच्या दोन चेंडूवर स्वैर मारा करत चिंतेचं वातावरण निर्माण केलं. मात्र त्यानंतर जोरदार पुनरागमन करत दिपकने डेव्हिड मिलरचा त्रिफळा उडवला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2019 csk bowler deepak chahar explains his thoughts after captain cool ms dhoni gets angry
First published on: 08-04-2019 at 22:46 IST