IPL 2019 KXIP vs RCB : बंगळुरूच्या संघाने कर्णधार विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर अखेर यंदाच्या हंगामातील पहिलावहिला विजय मिळवला. १७४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूने पंजाबला ८ गडी आणि ४ चेंडू राखून पराभूत केले. या विजयाबरोबर बंगळुरूने अखेर IPL २०१९ च्या गुणतालिकेत आपले खाते उघडले. या विजयनानंतर विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्स त्या दोघांनी चाहत्यांना एका व्हिडिओतून भावनिक संदेश दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

”आम्ही सलग सहा सामने पराभूत झालो, पण चाहत्यांनी आमच्यावरील विश्वास अजिबात कमी होऊ दिला नाही. आम्ही काही सामने अगदी कमी फरकाने पराभूत झालो. त्यामुळे काही वेळा आम्हालादेखील वाईट वाटले होते. पण चाहत्यांनी हार मानली नाही, तशीच आम्हीही हार मानली नव्हती. आणि अखेर आम्ही शनिवारी पहिला सामना जिंकला. हा विजय आमच्या चाहत्यांना समर्पित आहे.” असा भावनिक संदेश त्यांनी चाहत्यांना दिला.

दरम्यान, १७४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पार्थिव पटेलने ४ चौकार लगावत दणकेबाज सुरुवात केली होती. पण मोठा फटका खेळताना तो झेलबाद झाला. त्याने ९ चेंडूत १९ धावा केल्या. बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली याने चौकार षटकारांची आतषबाजी करत दमदार अर्धशतक केले. अर्धशतक केल्यानंतर फटकेबाजी करताना विराट कोहली झेलबाद झाला आणि बंगळुरूला दुसरा धक्का बसला. त्याने ८ चौकारांसह ५३ चेंडूत ६७ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर एबी डीव्हिलियर्स आणि मार्कस स्टॉयनीस या दोघांनी डाव सावरला आणि संघाला हंगामातील पहिला विजय मिळवून दिला. डीव्हिलियर्सने ३८ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकार ठोकत नाबाद ५९ धावा केल्या. तर स्टॉयनीसने १६ चेंडूत ४ चौकार लगावत नाबाद २८ धावा केल्या.

त्याआधी सलामीवीर ख्रिस गेलच्या आक्रमक खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने घरच्या मैदानावर खेळत असताना 173 धावांपर्यंत मजल मारली. लोकेश राहुल आणि ख्रिस गेल जोडीने पंजाबच्या डावाची अतिशय आक्रमक सुरुवात करुन दिली होती. मात्र लोकेश राहुल माघारी परतल्यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांनी हाराकिरी करत आपल्या विकेट फेकल्या. यामुळे मधल्या षटकांमध्ये पंजाबची धावगती मंदावली. मात्र ख्रिस गेलने अखेरच्या षटकांमध्ये आपला दाणपट्टा चालवत संघाला 173 धावांचा पल्ला गाठून दिला. ख्रिस गेलने 64 चेंडूत 99 धावांची खेळी केली

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या पंजाबच्या फलंदाजांनी पहिल्या षटकापासून बंगळुरुवर हल्ला चढवला. विशेषकरुन ख्रिस गेलने सर्वा गोलंदाजांची धुलाई केली. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत गेलने झटपट धावा जमवल्या. मात्र लोकेश राहुल माघारी परतल्यानंतर मयांक अग्रवाल, सरफराज खान आणि सॅम करन झटपट बाद झाले. यावेळी गेलने स्वतःवर संयम ठेवत एक बाजू लावून धरली. दुसऱ्या बाजूने मनदीप सिंहने त्याला चांगली साथ दिली. अखेरच्या षटकांत केलेल्या याच फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने आश्वासक धावसंख्येचा पल्ला गाठला. बंगळुरुकडून युजवेंद्र चहलने 2, तर मोहम्मद सिराज आणि मोईन अली यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2019 video virat kohli ab de villiers post emotional message on video
First published on: 14-04-2019 at 16:05 IST