आयपीएलच्या नव्या हंगामाला आता काही दिवसांचा अवधी उरला आहे. 9 एप्रिल ही तारीख जशी जवळ येत आहे, तशी या स्पर्धेत करोना प्रकरणांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे बीसीसीआयही चिंतेत आहे. या पार्श्वभूमीवर आता बीसीसीआयही खेळाडूंना करोनाची लस देण्याच्या विचारात आहे. याबाबत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी प्रतिक्रिया दिली.

राजीव शुक्ला म्हणाले ”करोना कधी जाईल, हे कोणालाही माहीत नाही. त्यामुळे आम्हाला विचार करणे भाग आहे. बीसीसीआय करोना लसीकरणावर विचार करीत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य मंत्रालयाशी संपर्क साधला जाईल जेणेकरुन खेळाडूंना लस दिली जाईल.”

 

गेल्या महिन्याच्या सुरूवातीला बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली खेळाडूंना करोना लस देण्याची कोणतीही योजना नाही, असे म्हटले होते. परंतु अलीकडील परिस्थिती पाहता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला आपली भूमिका बदलावी लागू शकते. राजीव शुक्ला यांनी आयपीएल स्पर्धेच्या तयारीविषयी सांगितले की, भारतीय बोर्ड आयपीएलसाठी सर्व आवश्यक पावले उचलत आहे.

शुक्ला म्हणाले, ”करोना प्रकरणे वाढत आहेत, त्यामुळे बीसीसीआयने आयपीएलसंदर्भात सर्व पावले उचलली आहेत. या स्पर्धेसाठी फक्त सहा जागा निवडल्या गेल्या आहेत. यासाठी बायो बबल बनविण्यात आले आहेत. संघांच्या सदस्यांची संख्याही वाढविण्यात आली आहे. स्पर्धा प्रेक्षकांशिवाय खेळली जाईल.”

आयपीएलचा चौदावा हंगाम 9 एप्रिल ते 30 मेदरम्यान खेळला जाईल. पहिला सामना गतविजेता संघ मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात चेन्नई येथे होईल.

आयपीएल 2021 आणि करोना

आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा अनुभवी सलामीवीर देवदत्त पडिक्कल करोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळला आहे.  देवदत्तपूर्वी, दिल्ली कॅपिटल्सचा स्टार फिरकीपटू अक्षर पटेल करोनाच्या चाचणीत पॉझिटिव्ह आढळला. यंदाच्या आयपीएलमध्ये करोनाची लागण झालेला अक्षर हा दुसरा आणि देवदत्त तिसरा खेळाडू आहे. कोलकाता नाइट रायडर्सचा खेळाडू नितीश राणाला करोनाने ग्रासले होते. मात्र, त्यानंतर तो निगेटिव्ह आढळला. चेन्नई सुपर किंग्जच्या कंटेट टीमच्या सदस्यालाही करोनाची लागण झाली आहे.