मुंबईच्या वानखेडेवर रंगलेल्या आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात आज दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जवर  7 गड्यांनी सहज विजय नोंदवला. नाणेफेक जिंकलेल्या दिल्लीने प्रथम चेन्नईला फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. सुरेश रैनाचे अर्धशतक, सॅम करन आणि मोईन अली यांच्या योगदानामुळे चेन्नईने 20 षटकात 7 बाद 188 धावा उभारल्या. सर्वांच्या नजरा लागून राहिलेल्या धोनीने मात्र निराशा केली. या सामन्यात त्याला खातेही उघडता आले नाही. प्रत्युत्तरात शिखर धवनने 85 तर पृथ्वी शॉने 72 धावांची खेळी करत दिल्लीचा विजय सोपा केला. शिखर धवनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीचा डाव

चेन्नईच्या 189 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या दिल्लीच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात केली. या दोघांनी पाच षटकात  संघाच्या 50 धावा फलकावर लावल्या. इंग्लंड दौऱ्यात नाव कमावलेल्या शार्दुल ठाकूरच्या पहिल्या षटकात धवन-शॉने 17 धावा वसूल केल्या. त्यानंतर शॉने 27 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. शॉनंतर धवननेही आपले अर्धशतक साकारले. या दोघांनी अकराव्या षटकात संघातचे शतक पूर्ण केले. आक्रमक झालेल्या पृथ्वीला ब्राव्हाने बाद करत चेन्नईला पहिले यश मिळवून दिले. पृथ्वीने 38 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांसह 72 धावा फटकावल्या. धवन शतकाकडे कूच करत असताना शार्दुलने त्याला पायचीत पकडले. धवनने 54 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकारांसह 85 धावा केल्या. धवन बाद झाल्यानंतर शिमरॉन हेटमायर आणि कर्णधार ऋषभ पंत यांनी दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

चेन्नईचा डाव

चेन्नईकडून फाफ डु प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड यांनी सलामी दिली. मात्र, दुसऱ्याच षटकात फाफ डु प्लेसिसला आवेश खानने शून्यावर पायचीत पकडले. त्याच्या पुढच्याच षटकात ख्रिस वोक्सने ऋतुराजला वैयक्तिक 5 धावांवर तंबूत धाडले आणि चेन्नईला अडचणीत टाकले. त्यानंतर सुरेश रैना आणि मोईन अली यांनी दणक्यात सुरुवात केली. 5 षटकात चेन्नईेने 2 बाद 30 धावा फलकावर लावल्या. मोईन अलीने नवव्या षटकात अश्विनला लागोपाठ दोन षटकार ठोकले. मात्र या षटकारानंतर अश्विनने त्याला तंबुचा मार्ग दाखवला. अलीने 4 चौकार आणि 2 षटकारांसह 36 धावांची खेळी केली.

10 षटकात चेन्नईने 3 बाद 71 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर आलेल्या अंबाटी रायुडू आणि सुरेश रैनाने तेराव्या षटकात संघाचे शतक फलकावर लावले. संघाचे शतक पूर्ण केल्यानंतर रैनाने आपले अर्धशतक साकारले. टॉम करनने या रैना-रायुडूची भागीदारी तोडली.  मोठी फटका खेळण्याच्या नादात रायुडू करनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 23 धावा केल्या. 16व्या षटकात रैना दुसरी धाव घेताना धावबाद झाला. आयपीएलचा मागील हंगाम न खेळलेल्या रैनाने दमदार पुनरागमन करत 4 षटकार आणि 3 चौकारांसह 54 धावांची खेळी केली. रैनानंतर सर्वांची नजरा लागून राहिलेला धोनी मैदानात आला, पण  आवेश खानने त्याला शून्यावर माघारी धाडले. धोनी बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांनी चेन्नईच्या डावाला आकार दिला. करनने 15 चेंडूत 34 धावांची खेळी करत संघाला चांगली धावसंख्या उभारून देण्यात मदत केली. तर, जडेजा 26 धावांवर नाबाद राहिला.  दिल्लीकडून ख्रिस वोक्स आणि आवेश खान यांनी प्रत्येकी 2 तर, अश्विन आणि टॉंम करन यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

दोन्ही संघांचे विदेशी खेळाडू 

दिल्ली संघात शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टॉइनिस, ख्रिस वोक्स,  टॉम करन या विदेशी खेळाडूंना स्थान देण्यात आले होते. तर, चेन्नई संघात मोईन अली, फाफ डु प्लेसिस, सॅम करन आणि ड्वेन ब्राव्हो या विदेशी खेळाडूंना जागा देण्यात आली होती.

प्लेईंग XI

दिल्ली कॅपिटल्स

पृथ्वी शॉ, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, शिमरॉन हेटमायर, ऋषभ पंत (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, आर. अश्विन, अमित मिश्रा, ख्रिस वोक्स, आवेश खान, टॉम करन.

चेन्नई सुपर किंग्ज

फाफ डु प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, अंबाटी रायुडू, सुरेश रैना, सॅम करन, महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रवींद्र जडेजा, मोईन अली, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, ड्वेन ब्राव्हो.

मराठीतील सर्व आयपीएल २०२१ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2021 csk vs dc match report adn
First published on: 10-04-2021 at 19:01 IST